माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सरमाउंटिंग चॅलेंजेस: दिल्ली मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील अभियांत्रिकी आव्हानाचे चित्रण


आमचा चित्रपट देशभरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देणारा ठरेल: अनुज दयाल

Posted On: 23 NOV 2021 5:56PM by PIB Mumbai

पणजी, 23 नोव्‍हेंबर 2021 

 

दिल्ली शहराची जीवनवाहिनी होण्यापासून ते शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आणि जीवघेणे अपघात कमी करण्याऱ्या दिल्ली मेट्रोने आज सर्वच दृष्टीने जागतिक दर्जाची जलद वाहतूक व्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र हे यश साध्य करण्याआधी, ही मेट्रो बांधत असताना संबंधित विभागांसमोर आलेल्या आव्हानांची आपल्या सर्वांना कल्पना आहे का?

गोव्यात सुरु असलेल्या 52व्या इफ्फी दरम्यान 'सरमाउंटिंग चॅलेंजेस' या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “हा चित्रपट दिल्ली मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामावर आधारित आहे. 2011 साली सुरु झालेले हे बांधकाम जवळपास 2020 साली संपले. या दहा वर्षांच्या काळात आम्ही मेट्रो बांधकामातल्या सर्व घडामोडींचे सातत्याने चित्रीकरण करत होतो.”

या मेट्रोचे बांधकाम करताना विभागाला आलेल्या विविध अडचणी आणि आव्हानांचे प्रतिबिंब या चित्रपटात आहे. या आव्हानांवर विभागाने कशी मात केली त्याचीही कथा यात आहे.

मेट्रोसोबतचा आपला जिव्हाळा व्यक्त करताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सतीश पांडे म्हणाले, की त्यांचा मेट्रोशी असलेला ऋणानुबंध खूप जुना आहे. 27 वषांपूर्वी त्यांनी दिल्ली मेट्रोवरच आपला पहिला चित्रपट बनविला होता. त्या चित्रपटाची संकल्पना दिल्लीला ‘मेट्रोची गरज का आहे’ अशी होती. ‘द ड्रीम फुलफिल्ड - मेमरीज ऑफ द इंजिनीअरींग चॅलेंजेस’ या चित्रपटासाठी पांडे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

“आणि तिथून मी माझ्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासाला सुरुवात केली. दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर आधारित चित्रपट मी निर्माण केले. मी मुंबई, नागपूर,पुणे,लखनौ,कानपूर,गोरखपूर,आग्रा आणि जयपूर या शहरांतील मेट्रो प्रकल्पांवर देखील अनेक चित्रपट तयार केले आहेत.” असे त्यांनी पुढे सांगितले.

ते म्हणाले की, ‘सरमाऊंटिंग चॅलेन्जेस’ हा मुख्य चित्रपट 2 तासांचा आहे आणि तो अत्यंत तांत्रिक पद्धतीचा असल्याने आयआयटीतील विद्यार्थी तसेच अभियंते यांच्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असेल. सध्या प्रदर्शित होत असलेला चित्रपट म्हणजे मूळ चित्रपटाची लहान आवृत्ती आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना निर्माते अनुज दयाल म्हणाले की, कोलकाता मेट्रोवर आधारित चित्रपट निर्मिती हा एक तापदायक अनुभव होता आणि या प्रक्रियेमुळे शहराला मोठ्या गोंधळाला तोंड द्यावे लागले.

एका प्रश्नाला उत्तर देताना अनुज म्हणाले की, मेट्रोचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी स्थानिक समुदायांशी विचारांची देवाणघेवाण करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खरेतर, ही अविरत सुरु असणारी संवाद प्रक्रिया होती जिच्या माध्यमातून सर्वांच्याच समस्यांवर उपाय शोधले गेले.

चित्रपटाविषयी थोडेसे

मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर दिलीतील सर्व प्रमुख भागांपर्यंत मेट्रोची सेवा पोहोचली. मात्र, या टप्प्यातील काम सुरु असताना अनेक मोठ्या अभियांत्रिकी आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्यामुळे या टप्प्याचे बांधकाम हा देखील सर्वात कठीण भाग होता. 11 विविध मार्गिकांच्या कामासाठी 160 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर बोगदे खणणारी 30 महाकाय यंत्रे आणि सुमारे 30,000 कामगारांचे हात लागले. अशा अभियांत्रिकी आव्हानांवर मात करण्यासाठी डीएमआरसीने कशा प्रकारे वेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या यावर हा चित्रपट भर देतो. 

कलाकार आणि श्रेयनामावली

दिग्दर्शक : सतीश पांडे

निर्माता : अनुज दयाल

पटकथा : अहाद उमर खान

जाहिरात विभाग : राजन कुमार श्रीवास्तव

संपादक : पवन कुमार

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774292) Visitor Counter : 198


Read this release in: English , Urdu , Hindi