श्रम आणि रोजगार मंत्रालय

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पहिल्या अखिल भारतीय पातळीवरील घर कामगार सर्वेक्षणाची सुरुवात करून दिली


अखिल भारतीय पातळीवरील घर कामगार सर्वेक्षणाचे काम सुरु असून ई-श्रम पोर्टल अंतर्बाह्य बदल घडवून आणेल आणि आकडेवारीवर आधारित धोरणांसाठी नवे मानदंड निश्चित करेल : भूपेंद्र यादव

Posted On: 22 NOV 2021 4:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2021

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज चंडीगडच्या कामगार मंडळाने सुरु केलेल्या देशातील पहिल्या अखिल भारतीय पातळीवरील घर कामगारांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करून दिली. अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण कामगारांमध्ये घर कामगारांचा लक्षणीय वाटा आहे. मात्र, या कामगारांच्या संख्येचा आवाका आणि त्यांच्या नोकऱ्यांची सध्याची परिस्थिती याबद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. म्हणूनच, घरकाम करणाऱ्या कामगारांबद्दल कालसुसंगत माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने, घर कामगारांबद्दल अखिल भारतीय पातळीवरील सर्वेक्षणाची जबाबदारी कामगार मंडळाकडे सोपविली आहे.

या प्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री यादव यांनी घर कामगारांच्या अखिल भारतीय सर्वेक्षणासाठीच्या प्रश्नमालिकेचा समावेश असलेली सूचना मार्गदर्शक पुस्तिका जारी केली. देशातील 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 742 जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारत स्वतंत्र झाल्यावर प्रथमच राष्ट्रव्यापी पातळीवर असे सर्वेक्षण होत आहे आणि यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि सरकारच्या सेवा लक्ष्याधारित पद्धतीने प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करणारे  पुराव्यावर आधारित, आकडेवारीनुसार चलित धोरण आखण्याची सरकारची प्रतिबद्धता दाखविते. हे अखिल भारतीय सर्वेक्षण आणि ई-श्रम पोर्टल अंतर्बाह्य बदल घडवून आणेल आणि आकडेवारीवर आधारित धोरणांसाठी नवे मानदंड निश्चित करेल असे ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमासाठी पाठविलेल्या संदेशात मंत्रालयाच्या आणि कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून  केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले कि हे सर्वेक्षण म्हणजे अत्यंत अविस्मरणीय उपक्रम आहे. या कार्यक्रमाला, केंद्रीय श्रम आणि रोजगार सचिव सुनील बर्थवाल, केंद्रीय श्रम आणि रोजगार विभागाचे मुख्य सल्लागार आणि मुख्य केंद्रीय कामगार आयुक्त डी.पी.एस.नेगी, कामगार मंडळाचे महासंचालक आय.एस.नेगी तसेच केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देशातील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर कार्यरत घर कामगारांची संख्या, लोकांच्या घरी राहून काम करणारे तसेच रोज ये-जा करून काम करणारे, औपचारिक तसेच अनौपचारिक रोजगार करणारे, स्थलांतरित तसेच कायम निवासी कामगार यांची टक्केवारी आणि त्यांचे वेतन तसेच इतर सामाजिक-आर्थिक घटकांबाबत निश्चित माहिती मिळण्याच्या दृष्टीने हे घरकामगारांचे अखिल भारतीय सर्वेक्षण सुरु करण्यात येत आहे.

 

 

 

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773976) Visitor Counter : 264