ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

कर्नाटकातील हुब्बळी येथील विभागीय कार्यालयाचे आणि तामिळनाडूमधील थंजावूर येथील अन्नसुरक्षा संग्रहालयाचे पीयूष गोयल यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन


'अन्नसुरक्षा' हा 'शेतकरी सुरक्षेला' समानार्थी शब्द, असून तिचा उगम ग्राहक सुरक्षेतून- गोयल

अन्नसुरक्षा सांभाळण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या लोकांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी सरकार कायम संवेदनशीलपणे काम करत आले आहे- गोयल

Posted On: 15 NOV 2021 10:05PM by PIB Mumbai

 

'आझादी का अमृतमहोत्सव' उपक्रमाचा भाग म्हणून, प्रगतिशील भारताची 75 वर्षे साजरी आणि संस्मरणीय करण्यासाठी, केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न तथा सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज कर्नाटकातील हुब्बळी येथील विभागीय कार्यालयाचे आणि तामिळनाडूमधील थंजावूर येथील अन्नसुरक्षा संग्रहालयाचे व छायाचित्र प्रदर्शनाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना गोयल यांनी कर्नाटकात हुब्बळी येथे विभागीय कार्यालयासाठी नवीन वास्तूचे उद्घाटन करण्याबद्दल भारतीय अन्न महामंडळाचे अभिनंदन केले. "अन्नसुरक्षेसाठी लवचिक आणि टिकाऊ पायाभूत सुविधा निर्माण करण्याची पंतप्रधानांची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. कापसाचे व्यापारकेंद्र म्हणून ओळखले जाणारे हुब्बळी आता अन्नसुरक्षा केंद्र म्हणून उदयाला येत असून, नवभारताच्या प्रगतीचेच हे प्रतिबिंब आहे" असे मत गोयल यांनी व्यक्त केले.

"भारताची आणि जगाची भूक भागविण्यासाठी तसेच चांगले उत्पन्न मिळविण्यासाठीशेतकरी बांधवांना सक्षम करावे- हेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात कार्यरत केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. " असे गोयल यांनी सांगितले. सर्वाधिक खरेदी करण्यापासून ते धान्याचा पुरवठा करेपर्यंत पंतप्रधानांची शेतकऱ्यांप्रती आणि स्थलांतरित कामगारांप्रती असलेली वचनबद्धता अतिशय प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले. कोविड संकट कोसळल्यावर पंतप्रधानांना सुचलेला पहिला विचार होता तो म्हणजे, गरीब आणि स्थलांतरित बंधू-भगिनींच्या हिताचा विचार"- असेही गोयल यांनी सांगितले.

"भारतीय जनतेच्या अन्नसुरक्षेप्रती सरकारची वचनबद्धता अतुलनीय असून, किमान हमीभावात शेतकऱ्यांकडून सर्वाधिक धान्यखरेदी हा त्याचाच परिपाक होय."- असे प्रतिपादन गोयल यांनी केले. भारतीय अन्न महामंडळ आणि अन्य सरकारी संस्थांनी पंतप्रधानांची ही उत्कृष्ट संकल्पना साकारण्यासाठी घेतलेल्या प्रचंड परिश्रमांबद्दल गोयल यांनी त्यांचे कौतुक केले.

अन्नसुरक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या पायाभूत सुविधांना आवश्यक सोयीसुविधांची जोड देण्यासाठी सरकारने अन्नधान्याच्या साठवणुकीकरिता पुरेशी व्यवस्था करण्याचा विचार प्रत्यक्षात आणला. त्यामुळे आता शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवण करणारी गोदामे आणि अत्याधुनिक साठ्वणगृहे निर्माण होत आहेत, असेही गोयल यांनी सांगितले.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि साध्वी निरंजन ज्योती हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

R.Aghor/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772152) Visitor Counter : 156


Read this release in: English , Hindi , Tamil , Kannada