भूविज्ञान मंत्रालय
भारताने अंटार्क्टिकासाठीच्या 41व्या वैज्ञानिक मोहिमेला केली सुरुवात
Posted On:
15 NOV 2021 6:36PM by PIB Mumbai
भारताने पाठविलेल्या वैज्ञानिकांच्या पहिल्या तुकडीच्या अंटार्क्टिका येथील आगमनासह देशाच्या 41 व्या वैज्ञानिक मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात वैज्ञानिक आणि त्यांचे मदतनीस अशा 23 जणांची पहिली तुकडी मैत्री या अंटार्क्टिकावरील स्थानकावर पोहोचली. जानेवारीच्या मध्यापर्यंत ड्रोमलॅन सुविधेच्या माध्यमातून हवाई मार्गाने आणि बर्फाळ वातावरणातील प्रवासास योग्य अशा एमव्ही वासिलीय गोलोव्हनिन या वाहनातून आणखी चार भारतीय तुकड्या अंटार्क्टिका येथे पोहोचतील.
भारताच्या या 41 व्या मोहिमेत दोन महत्त्वाचे कार्यक्रम समाविष्ट आहेत.पहिल्या कार्यक्रमात भारतीय स्थानकापाशी असलेल्या अमेरी बर्फखंडाचे भूगर्भीय संशोधन केले जाईल. यातून भूतकाळात भारत आणि अंटार्क्टिका यांच्यात असलेल्या संबंधांचा शोध घेता येईल. दुसऱ्या कार्यक्रमात, मैत्री स्थानकाजवळ बर्फात 500 मीटर खोल खोदकाम करण्यासाठीचे प्राथमिक सर्वेक्षण आणि तयारीवजा कामाचा समावेश आहे. यातून अंटार्क्टिका येथे असणारे हवामान, पश्चिमी वारे, समुद्री बर्फ आणि हरितगृह वायुंविषयीअधिक उत्तम प्रकारे माहिती मिळवता येणार आहे.बर्फ खोदण्याचे काम ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षण आणि नॉर्वेजियन पोलर संस्थेच्या सहकार्याने केले जाईल. शास्त्रीय कार्यक्रम राबविण्यासोबतच या मोहिमेद्वारे, मैत्री तसेच भारती या स्थानकांवरील अन्न, इंधन, इतर सामग्रीचा साठा आणि जीवनाधार प्रणालीची देखभाल तसेच नव्या कामांसाठी लागणारे सुटे भाग यांच्या वार्षिक साठ्याचे पुनर्भरण देखील केले जाईल.
1981 मध्ये सुरु झालेल्या भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमामध्ये आतापर्यंत ४० वैज्ञानिक मोहिमा पूर्ण केल्या आहेत तसेच भारताने या दरम्यान अंटार्क्टिका येथे संशोधनविषयक कार्यासाठी दक्षिण गंगोत्री (1983), मैत्री (1988) आणि भारती (2012) ही तीन कायमस्वरूपी स्थानके देखील उभारली आहेत. सद्यस्थितीला, मैत्री आणि भारती ही दोन स्थानके पूर्णपणे कार्यान्वित आहेत.भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले गोवा स्थित राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन केंद्र या स्वायत्त संस्थेद्वारे संपूर्ण भारतीय अंटार्क्टिका कार्यक्रमाचे व्यवस्थापन होत असते.
अंटार्क्टिका खंड कोविड-19 विषाणूपासून मुक्त ठेवण्यासाठी आणि उच्च दर्जाच्या सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्यामुळे तेथे गेलेल्या भारतीय तुकडीतील सदस्यांची मोहिमेवर निघताना नवी दिल्ली येथील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कडक वैद्यकीय तपासणी झाली तसेच या तुकडीतील सदस्यांनी उत्तराखंडातील औली येथील भारतीय-तिबेटी सीमा पोलिसांच्या गिर्यारोहण आणि स्कीइंग संस्थेत बर्फाळ प्रदेशातील वातावरणाशी जुळवून घेऊन काही काळ राहण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण पूर्ण केले आणि दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे 14 दिवसांच्या अलगीकरण कालावधीसह स्वच्छताविषयक कडक नियमांची पूर्तता केली आहे.
या मोहिमेवर गेलेला चमू हिवाळ्यात तेथे राहणाऱ्या पथकाला सोडून 2022 मध्ये मार्च महिन्याच्या शेवटी अथवा एप्रिलच्या सुरुवातीला परत येईल. यातना त्यांच्यासोबत 40व्या मोहिमेतील हिवाळी पथक परत येईल. 41 व्या मोहिमेचे नेतृत्व राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन केंद्रातील (प्रवास प्रमुख)शास्त्रज्ञ डॉ.शैलेन्द्र सैनी भारतीय हवामान विभागाचे मोजमाप तज्ञ हुईड्रोम नागेश्वर सिंग (मैत्री स्थानकाचे प्रमुख) आणि भारतीय भू-चुंबकीय संस्थेतील अनुप कलायील सोमण (भारती स्थानकाचे प्रमुख) करत आहेत.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772058)
Visitor Counter : 346