सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चाळिसाव्या 'इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर, 2021' या आंतरराष्ट्रीय व्यापार महासंमेलनात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्राच्या प्रदर्शनमंडपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 15 NOV 2021 6:07PM by PIB Mumbai

 

केंद्रीय एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज चाळिसाव्या 'इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर, (आयआयटीएफ) 2021' या आंतरराष्ट्रीय व्यापार महासंमेलनात एमएसएमई उद्योगक्षेत्राच्या प्रदर्शनमंडपाचे उद्घाटन केले. एमएसएमई राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रगती मैदानावर 7-FGH सभागृहात हा एमएसएमई प्रदर्शनमंडप उभारण्यात आला आहे.

"या व्यापार महासंमेलनामुळे एमएसएमई उद्योजकांना, विशेषतः महिला उद्योजक, अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींतील उद्योजक आणि आकांक्षी जिल्ह्यांतील उद्योजक यांना, आपली कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी, आपली उत्पादने जगासमोर आणण्यासाठी एक चांगली संधी मिळू शकेल. तसेच प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करण्यास आणि आत्मनिर्भर होण्यास त्यांना यामुळे वाव मिळेल" असा विश्वास, राणे यांनी यावेळी व्यक्त केला. "सरकारच्या उद्योगानुकूल धोरणामुळे व एमएसएमई मंत्रालयाच्या विविध योजना/कार्यक्रमांमुळे एमएसएमई उद्योगक्षेत्राच्या पूर्ण वाढीला वाव मिळत आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला 5 लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यास मदत होत आहे" असेही ते म्हणाले.

राणे यांनी यावेळी एमएसएमई प्रदर्शनमंडपात फेरी मारून त्यात सहभागी झालेल्या विविध एमएसएमई उद्योजकांची व संबंधितांची भेट घेतली. आयुष, सिरॅमिक्स, रसायने, सौंदर्यप्रसाधने, विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे, भरतकाम, खाद्यपदार्थ, पादत्राणे, हस्तकला, हातमाग, गृह-सजावट, मध, ताग, चामडे, धातुकाम, मौल्यवान रत्ने व दागिने, वस्त्रोद्योग, खेळणी, लाकूडकाम अशा सुमारे 20 क्षेत्रांतील 316 सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योजकांनी यात भाग घेतला असून आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडले आहे.

यावर्षी, एमएसएमई प्रदर्शनमंडपात महिला उद्योजकांनी आजवरचा सर्वोच्च (71%) सहभाग नोंदवला आहे. तसेच देशाच्या विविध भागांतून आलेल्या अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातींच्या उद्योजकांचाही यात समावेश आहे.

***

S.Tupe/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1772042) Visitor Counter : 308


Read this release in: Tamil , Malayalam , English , Hindi