आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालय आयआयटीएफ 2021 मध्ये स्टॉल उभारणार

व्यापार मेळाव्यात आयुर्वेदावर आधारित नवीन खाद्यपदार्थ

Posted On: 13 NOV 2021 8:45PM by PIB Mumbai

 

मधुमेह, लठ्ठपणा, तीव्र वेदना आणि पंडुरोग यासह इतर रुग्णांना आहारासंबंधी आवश्यक सहाय्य प्रदान करणाऱ्या पौष्टिक पदार्थांचा रेडी टू कुक संच या वर्षीच्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात दालन  क्रमांक 10 मधील आयुष मंत्रालयाच्या  स्टॉलवरचे  प्रमुख आकर्षण असेल.

न्युट्रास्युटिकल्स ही प्रामुख्याने अन्नपदार्थांच्या स्रोतांमधून मिळवलेली उत्पादने आहेत ज्यात मूलभूत पौष्टिक मूल्यांव्यतिरिक्त अतिरिक्त आरोग्य फायदे आहेत. पावडर स्वरूपात पॅक केलेल्या या पाककृती अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (AIIA) संशोधकांनी संस्थेच्या महाभैषज्य या प्रस्तावित फूड स्टार्टअप अंतर्गत विकसित केल्या आहेत. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक संशोधन संस्था आहे.

या पाककृतींमध्ये कँडी, क्षुधावर्धक, पीठ आणि लाडू यांचा समावेश आहे. पाकिटावर कृती  आणि  या पाककृतींचे आरोग्य फायदे नमूद केले आहेत.

आयुर्वेद आहारशास्त्रावर आधारित पौष्टिक आणि चविष्ट खाद्यपदार्थ, आयुर्वेदिक आहारशास्त्रावर आधारित नवीन पाककृतींव्यतिरिक्त, आयुषच्या आरोग्य अभ्यासकांशी मोफत सल्लामसलत, योग प्रशिक्षण आणि भारतीय पारंपारिक औषध पद्धतींवर आधारित मनोरंजक प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या युवकांसाठी आकर्षक भेटवस्तू ही आयुष मंत्रालयाच्या स्टॉलवरील  इतर आकर्षणे असतील. या मेळाव्याला भेट देणाऱ्यांना हलवा घीवार, आवळा मुरंबागुलकंद आणि युनानी हर्बल चहा यांसारख्या विविध आयुष पदार्थांचा आस्वाद घेता येईल.

व्यापार मेळा म्हणून ओळखला जाणारा तसेच  व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पादक, व्यापारी, निर्यातदार आणि आयातदार यांना एक समान व्यासपीठ प्रदान करणारा हा भव्य कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.  कार्यक्रमाचे पहिले पाच दिवस, 14 ते 18 नोव्हेंबर हे  व्यापारी आणि गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील, तर सर्वसामान्यांसाठी हा व्यापार मेळावा  19 नोव्हेंबर रोजी  खुला होईल.

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवउपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आयोजित करण्यात आलेला, हा व्यापार मेळावा IITF-2021 यावर्षी 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेवर  आधारित आहे.

होमिओपॅथी, आयुर्वेद, सिद्ध, युनानी , योग आणि निसर्गोपचार यांसारख्या आयुष शाखा अंतर्गत  अन्न पदार्थ  आणि औषधाचा प्रचार करण्यासाठी स्वतंत्र काउंटर असतील. या शाखांचे  आरोग्य चिकित्सक मोफत ओपीडी सल्ला देखील देतील. तसेच  तज्ञ योग प्रशिक्षकांकडून योग शिकण्याची संधी देखील मिळेल अशी माहिती मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी  दिली.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1771541) Visitor Counter : 49


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu