नौवहन मंत्रालय
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज जेएनपीटीला भेट दिली
नजीकच्या भविष्यात जेएनपीटी एक भव्य बंदर बनणार आहे - ज्या काही उच्च दर्जाच्या सुविधा अंतर्भूत करणे आवश्यक असेल त्या प्रभावीपणे केल्या जातील: सर्बानंद सोनोवाल
“पीएम गति शक्ती योजना अल्पावधीतच देशाची अर्थव्यवस्था मजबूत करेल”
Posted On:
13 NOV 2021 4:36PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, नौवहन , जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (JNPT) भेट दिली. या भेटीदरम्यान, सर्बानंद सोनोवाल यांनी कराल जंक्शन येथे जेएनपीटी काँक्रीट रस्ता सुविधा प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभाचे उद्घाटन केले आणि जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाला भेट देऊन सीपीपी कमांड सेंटर येथे त्यांच्या तंत्रज्ञान-सक्षम कार्यांचा आढावा घेतला. तिथे त्यांनी सागरी पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग असलेल्या कंटेनर ट्रक चालकांशी संवाद साधला. त्यानंतर सोनोवाल यांनी जेएनपीटी रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन संयंत्राचे उद्घाटन केले. त्यांनी जीटीआय हाऊस येथे टर्मिनल ऑपरेशन्सवरील सादरीकरणाचाही आढावा घेतला आणि जहाजतून प्रवास करून जेएनपीटीच्या बहु-उत्पादन सेझ आणि हिंद टर्मिनल सीएफएसला भेट दिली. तसेच, केंद्रीय मंत्र्यांनी बीएमसीटीपीएलने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट पोर्ट उपक्रमाची पाहणी केली आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराच्या प्रगतीचा आढावा घेतला.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले, "जेएनपीटी नजीकच्या भविष्यात एक भव्य बंदर बनणार आहे. हा भविष्यातील आराखडा आमच्या विचाराधीन आहे. त्यासाठी बंदर वापरकर्त्यांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यासाठी ज्या काही उच्च दर्जाच्या सुविधा उभारण्याची गरज आहे, त्या प्रभावीपणे उभारल्या जातील.
ते पुढे म्हणाले, जेएनपीटी जागतिक मानकांच्या बरोबरीने देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून नाव कमवण्यात यशस्वी झाले आहे. जेएनपीटी वचनबद्धतेसह देशाची सेवा करत आहे, असेही ते म्हणाले. बंदराच्या अत्याधुनिक ट्रक टर्मिनसचा उल्लेख करून सोनोवाल म्हणाले, जेएनपीटीने व्यवसाय सुलभतेच्या दिशेने एक प्रशंसनीय पाऊल टाकले आहे. लोडिंग आणि अनलोडिंगचा टर्न-अराउंड वेळ 26 तासांपर्यंत कमी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत जेएनपीटीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी काळात जेएनपीटी आणखी पुढे जाईल आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात आणि शेतकऱ्यांची उत्पादने परदेशात निर्यात करण्यात मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. . जेएनपीटीचे अधिकारी टीम इंडियाच्या भावनेने काम करत असल्यामुळे त्यांना यशस्वी होण्यात मदत झाली आहे,” असे ते म्हणाले.
पोर्ट ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत ज्याचा निर्यातदार आणि आयातदारांना फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले.
पीएम गति शक्ती योजनेचा संदर्भ देताना सोनोवाल म्हणाले, विविध मंत्रालयांकडून केल्या जात असलेल्या एकात्मिक प्रयत्नामुळे देशभरातील विकास कामांना गती मिळेल. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना विविध विभाग आणि मंत्रालयांना एकाच उद्देशाने एकत्र आणून , एकात्मिक आणि समन्वित प्रयत्नांनी काम करते, ही योजना नागरिकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. जेएनपीटीच्या विशेष आर्थिक क्षेत्रांच्या संदर्भात ते म्हणाले, सेझ हे गतिशक्ती योजनेचे महत्त्वाचे घटक आहेत. जलमार्ग , हवाई मार्ग , रेल्वे या संपर्क साधनांना एकत्र आणले आणि व्यापाराच्या उद्देशाने एकजुटीने त्यांनी आपली भूमिका पार पाडली किंवा लोकांना योग्य वेळी सोयीसुविधा पुरवल्या तर देशाची अर्थव्यवस्था निश्चितच अल्पावधीत बळकट होईल. यात सामान्य जनतेचीही मोठी भूमिका आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कंटेनर टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, संपूर्ण देशातील या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. "सर्व संबंधित मंत्रालयांनी योग्य दृष्टीकोनातून प्रयत्न केले आहेत", असे ते पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीबाबत, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, “केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीमुळे आमच्या बंदर संबंधी हितधारकांना त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची आणि भारताच्या वाढत्या सागरी क्षेत्राबद्दल तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली सागरी धोरणे सर्वांगीण विकासात कशा प्रकारे हातभार लावू शकतील याबद्दल आपली मते सामायिक करण्याची संधी मिळाली. ”
जेएनपीटीच्या अधिकार्यांनी केंद्रीय मंत्र्यांना अलिकडेच सुरू केलेली 'ड्वार्फ कंटेनर ट्रेन' सेवा आणि वाढवण बंदराची स्थिती तसेच जेएनपीटीच्या इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसह व्यवसाय सुलभतेसाठी बंदराकडून हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली.
तत्पूर्वी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी आणि जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले, यावेळी त्यांना जेएनपीटी येथे तैनात सीआयएसएफच्या जवानांनी मानवंदना दिली.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771474)
Visitor Counter : 237