आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
महिनाभर चालणाऱ्या ‘हर घर दस्तक’मोहिमेबद्दल जागरुकता वाढवण्याकरिता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले प्रसारमाध्यमांसाठी राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
Posted On:
12 NOV 2021 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महिनाभर चालणाऱ्या हर घर दस्तक मोहिमेबद्दल जागरुकता वाढवण्याकरिता आज प्रसारमाध्यमांसाठी एका राष्ट्रीय संवादी वेबिनारचे आयोजन केले होते, ज्याचा उद्देश सर्व प्रौढ लोकसंख्येला कोविड लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याची खातरजमा करून दुसऱ्या मात्रेसाठी पात्र व्यक्तींना दुसरी मात्रा घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे. तर ज्या प्रौढ व्यक्तींनी लसीची पहिली मात्रा घेतली नाही किंवा काही कारणास्तव त्यांची दुसरी मात्रा घेणे बाकी आहे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ‘हर घर दस्तक’ म्हणजे प्रत्येक घरापर्यंत पोहोचून लस देणे आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पात्र लोकसंख्येच्या 50% पेक्षा कमी लसीकरण केले गेले आहे अशा जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून आरोग्य सेवा कर्मचारी संपूर्ण भारतातील पात्र लोकांचे घरोघरी जाऊन लसीकरण करतील.
संवादात्मक वेबिनारला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ मनोहर अग्नानी यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, भारताच्या सध्याच्या लसीकरणाच्या गतीनुसार आम्ही आत्मविश्वासाने दावा करू शकतो की 16 जानेवारी 2021 रोजी सुरू करण्यात आलेला जगातील सर्वात मोठा प्रौढ लसीकरण कार्यक्रम योग्य मार्गावर आहे.
लसीबाबत उत्साह झपाट्याने वाढत असताना, शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती उपलब्ध करण्यामध्ये असलेली नव्या प्रकारची आव्हाने देखील आहेत. ज्यामध्ये दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी उपलब्धतेच्या समस्या, दुष्परिणामांची निरंतर भीती आणि काही समुदायांमध्ये लसीबाबतची टाळाटाळ अशी अनेक कारणे लस न घेणाऱ्या काही लोकांची असू शकतात. लोकांना कोविड 19 प्रतिबंधक लस घेण्यापासून परावृत्त करणाऱ्या प्रत्यक्षातील अनेक समस्या देशातील आघाडीचे कर्मचारी सोडवत आहेत असे निरीक्षण डॉ अग्नानी यांनी मांडले. ज्यांनी लस घेतलेली नाही अशा लोकांना प्रेरित करण्यासाठी मोहिमेमध्ये स्थानिक धार्मिक आणि सामुदायिक नेते आणि इतर संस्था, संघटना जसे की केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (CSO), गैर-सरकारी संस्था, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) इत्यादींशी निकट सहकार्य करण्याची कल्पना आहे. लसविरोधी अफवांचा प्रतिकार करण्यासाठी तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये जास्तीत जास्त लसीकरण केलेल्या जिल्ह्यांद्वारे अवलंबिलेले नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि पद्धतींचे अनुकरण करण्यासाठी मल्टीमीडिया माहिती, शिक्षण आणि संप्रेषण (IEC) मोहीम तयार केली जाईल.
सहभागी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, डॉ अग्नानी यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेण्याच्या महत्त्वावर भर दिला. प्रसारमाध्यमांनी सकारात्मक कथांद्वारे लोकांना प्रेरित करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रसारमाध्यमांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानून, त्यांनी देशातील काही भागात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी लढा देण्याची विनंती केली.
वेबिनारमध्ये भारतभरातील पीआयबी, दूरदर्शन, आकाशवाणी, प्रादेशिक संपर्क विभाग, युनिसेफ राज्य कार्यालये, खाजगी FM रेडिओ, कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स, ऑनलाइन आणि मुद्रित माध्यमांचे अधिकारी उपस्थित होते.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771349)
Visitor Counter : 422