उपराष्ट्रपती कार्यालय
केंद्र सरकारच्या उपक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे राज्यपालांना आवाहन
राष्ट्रीय विकास कार्यात सहभागी होण्यासाठी राज्यपालांनी लोकांना प्रेरित करावे – उपराष्ट्रपती
Posted On:
11 NOV 2021 8:42PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल आणि नायब राज्यपालांना केंद्र सरकारच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचे आणि राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होण्यासाठी लोकांना एकत्रित करण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले . नवी दिल्ली येथे आज राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या परिषदेला संबोधित करताना, नायडू यांनी त्यांना प्रभावी लोकसहभागासह राष्ट्राच्या प्रगतीसाठी 'सब का साथ-सब का प्रयास' या तत्त्वज्ञानाने प्रेरित केंद्र सरकारने सुरू केलेल्या व्यापक उपक्रमांवर देखरेख आणि मार्गदर्शन करायला सांगितले.
नायडू यांनी पर्यावरण संरक्षण, शेतकऱ्यांमध्ये उद्योजकतेला चालना, सर्वांसाठी आरोग्यसेवा, सार्वजनिक जीवनात घटनात्मक मूल्ये आणि नैतिकतेचा प्रचार यासह अनेक मुद्द्यांवर आपले विचार आणि चिंता सामायिक केल्या. सार्वजनिक जीवनातील राज्यपालांच्या विपुल अनुभवाबाबत बोलताना, उपराष्ट्रपतींनी धोरणे आखणी आणि त्यांची अंमलबजावणी, दुर्मिळ संसाधनांचा प्रभावी वापर सुनिश्चित करणे आणि सार्वजनिक जीवनात सचोटी आणि नैतिकता सुनिश्चित करण्यात राज्यपालांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. "राज्यपाल आणि नायब राज्यपालांनी केवळ घटनात्मक अधिकार म्हणून काम न करता मुत्सद्दी नेत्याच्या नैतिक अधिकाराने काम करायला हवे " अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली.
हवामान बदलाबाबत वाढती चिंता आणि सध्या सुरू असलेल्या कॉप -26 जागतिक बैठकी संदर्भात, नायडू यांनी राज्यपालांना वृक्षारोपण, जलसंवर्धन, पर्यावरणपूरक बांधकाम, कचरा व्यवस्थापन सारख्या हवामान अनुकूल कृतींसाठी लोक चळवळीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
100 कोटींहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा दिल्याबद्दल टीम इंडियाच्या प्रयत्नांचे कौतुक करून, उपराष्ट्रपतींनी राज्यपालांना लसीकरणाबाबतच्या संकोचावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. तसेच निरोगी जीवनासाठी जीवनशैलीत बदल करण्याचे आणि सर्वांसाठी आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आवाहन केले
नायडू यांनी राज्यपाल आणि नायब राज्यपालांना राज्य कारभार आणि सार्वजनिक जीवनात तत्वज्ञान आणि संविधानातील तरतुदींचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771044)
Visitor Counter : 250