पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये अमेरिका बनले 101वे सभासद राष्ट्र


आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मजबूत होऊन भविष्यात जगाला स्वच्छ ऊर्जा स्रोत पुरवण्याच्या कामाला चालना मिळेल : भूपेंदर यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होताना आम्हाला आनंद होत आहे : जॉन केरी

Posted On: 10 NOV 2021 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021

जागतिक स्तरावर सौरऊर्जेच्या स्वीकाराला मोठी चालना देणारे एक पाऊल म्हणून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सभासदत्व स्वीकारल्याचे हवामान बदल या विषयातील अमेरिकेचे विशेष राजदूत जॉन केरी यांनी सांगितले.

सौर ऊर्जेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ऊर्जा परिवर्तनाला चालना देणाऱ्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या करारावर स्वाक्षऱी करणारे अमेरिका हे 101 वे राष्ट्र आहे.

"ही काळाची गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होताना आम्हाला आनंद होत आहे.", असे या कराराच्या आराखड्यावर स्वाक्षऱ्या करताना अमेरिकेचे हवामान बदलासंबंधीचे विशेष राजदूत जॉन केरी यांनी सांगितले.

"काही तपशीलांवर काम केल्यानंतर या प्रक्रियेचा भाग बनताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या वापरासाठी हे महत्त्वाचे योगदान आहे विशेषतः विकसनशील देशांसाठी हे जास्त महत्त्वाचे आहे", असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा होलांद यांनी 30 नोव्हेंबर 2015 रोजी फ्रान्समध्ये पॅरिस येथे भरलेल्या (COP-21) या संयुक्त राष्ट्रांच्या 21 व्या  हवामान बदल परिषदेत केली होती.

संयुक्त राष्ट्रांचे माजी सचिव बान की मून हे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या स्थापनेच्या वेळी उपस्थित होते. त्याशिवाय सौरऊर्जेला चालना देण्याच्या उद्देशाने या आघाडीत सहभागी होण्याची ग्वाही देणाऱ्या 120 देशांचे प्रमुख ही यावेळी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय सौर गटाचा 101 वा सभासद होण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वागत केले. "यामुळे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी चळवळ बळकट होईल आणि जगाला स्वच्छ ऊर्जा स्रोत पुरवण्याच्या भविष्यातील कृतीला चालना मिळेल", असे ते म्हणाले.

 

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1770789) Visitor Counter : 866


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu