संरक्षण मंत्रालय

'वेला' ही स्कॉर्पीन जातीची चौथी पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

Posted On: 09 NOV 2021 7:06PM by PIB Mumbai

 

'प्रोजेक्ट-75' या प्रकल्पातील चौथी पाणबुडी - 'यार्ड 11878' आज दि. 09 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. स्कॉर्पीन प्रकारच्या सहा पाणबुड्या तयार करण्याचा 'प्रोजेक्ट-75' या प्रकल्पात समावेश आहे. या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईत 'माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड' येथे होत असून फ्रान्सच्या मेसर्स नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने हे काम केले जात आहे. 'वेला' नावाच्या या पाणबुडीचे दि. 06 मे 19 रोजी जलावतरण झाले असून, कोविडविषयक निर्बंध असूनही तिचे सर्व प्रमुख बंदरांमध्ये आणि समुद्रात परीक्षण करून झाले आहे. तसेच या पाणबुडीच्या, शस्त्रास्त्रे आणि संवेदकांशी संबंधित चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. या प्रकारापैकी तीन पाणबुड्या याआधीच भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.

 पाणबुडी तयार करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे व अवजारे अगदी लहान आकाराची असतात आणि त्यांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करून चालत नाही. त्यामुळे पाणबुडीची निर्मिती हे एक गुंतागुंतीचे काम ठरते. भारतीय यार्डामध्ये या पाणबुड्यांची निर्मिती हे, 'आत्मनिर्भर भारताच्या' दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हटले पाहिजे.

ही पाणबुडी लवकरच भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार असून त्यामुळे नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

 

 

  

***

N.Chitale/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1770364) Visitor Counter : 449


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil