पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मॉइल कर्मचाऱ्यांसाठी वेतन सुधारणा घोषित

Posted On: 31 OCT 2021 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्टोबर 2021 

 

नागपूरमध्ये 31 ऑक्टोबर, 2021 रोजी आयोजित एका भव्य कार्यक्रमात, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री माननीय श्री. नीतीन गडकरी आणि पोलाद मंत्री माननीय श्री राम चंद्र प्रसाद सिंह यांनी मॉइल कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेला मान्यता दिल्याची एक मोठी घोषणा केली.

ही वेतन सुधारणा 01.08.2017 ते  31.07.2027 या कालावधीसाठी आहे. यामुळे सुमारे 5,800 कंपनी कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. मॉइल व्यवस्थापन आणि मॉइल कामगार संघटना (एमकेएस) ही मॉइलची मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या आधारावर ही वेतन सुधारणा करण्यात आली आहे.या प्रस्तावामध्ये 20% फिटमेंट लाभ आणि 20% दराने लाभ/भत्ते समाविष्ट आहेत. मे,2019 पासून कंपनीने मूलभूत आणि महागाई भत्त्याच्या 12% दराने तात्पुरता दिलासा  दिला आहे.

कंपनी  1 ऑगस्ट 2017 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीतील देय थकबाकी  एकाच वेळी चुकती करेल,असे कंपनीने जाहीर केले आहे.यामुळे कंपनीवर सुमारे 218 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.प्रस्तावित वेतन सुधारणेचा एकूण आर्थिक खर्च सुमारे रु.87 कोटी प्रतिवर्ष होईल.मात्र मॉइल लिमिटेडने आपल्या खाते  पुस्तिकेत  या वेतन वाढीसाठी आधीच संपूर्ण तरतूद केली आहे.

याशिवाय, 2020-21 या वर्षासाठी सर्व कर्मचार्‍यांसाठी 28,000/- रुपयांचे उत्पादन संलग्न सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात आली असून दिवाळीपूर्वी ते वितरीत करण्यात येणार आहे.

यावेळी माननीय मंत्र्यांनी  मॉइलच्या विविध सुविधांचे उद्घाटनही केले.  यात चिकला खाणीतील दुसरी व्हर्टिकल  शाफ्ट,  त्यांच्या पाच खाणींच्या ठिकाणी रुग्णालये, प्रशासकीय इमारत, आणि पदवीधर प्रशिक्षणार्थी वसतिगृह याचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय पोलाद आणि ग्रामविकास राज्यमंत्री श्री फग्गनसिंग कुलस्ते, राज्याचे  पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, .पोलाद मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार श्रीमती  सुकृति लिखी, पोलाद मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती रुचिका गोविल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांचे म्हणणे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले कर्मचारी आणि विविध युनियन सदस्यांना या घोषणांचा अत्यंत  आनंद झाला आणि त्यांनी पोलाद मंत्रालयाचे मनःपूर्वक  आभार मानले.या प्रसंगी, माननीय केंद्रीय पोलाद मंत्री, श्री आरसीपी सिंह यांन सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मॉइलचे अभिनंदन केले आणि भविष्यात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

माननीय पोलाद मंत्री 1 नोव्हेंबर, 2021 रोजी बालाघाट खाणीलाही भेट देणार आहेत, ही मॉइल द्वारे  चालवली जाणारी सर्वात मोठी आणि आशियातील सर्वात खोल भूमिगत मॅंगनीज खाण आहे.

 

मॉइल बद्दल:

मॉइल लिमिटेड हा भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या  प्रशासकीय नियंत्रणाखालील अनुसूची-अ, मिनीरत्न श्रेणी-I मधील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.मॉइल  ही देशातील मॅंगनीज धातूची सर्वात मोठी उत्पादक आहे आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यात अकरा खाणींचे कार्यान्वयन करते.मॉइल कडे देशातील ~ 34% मॅंगनीज धातूचा साठा आहे आणि ही कंपनी देशांतर्गत उत्पादनात ~ 45% योगदान देत आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत  उत्पादन जवळपास दुप्पट करून 25 लाख मेट्रिक टन पर्यंत उत्पादन नेण्याचा कंपनीचा महत्वाकांक्षी दृष्टीकोन आहे.मॉइल गुजरात राज्यात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि ओडिशा राज्यातील इतर भागात व्यवसाय संधी शोधत आहे.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1768197) Visitor Counter : 143