युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
आपली राज्यघटना कलम 15 द्वारे सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून निसर्गाचा आदर करण्याचे आवाहन करते- अफरोज शाह
स्वच्छ भारतासाठी योग्य वर्तन या विषयावर पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या वतीने वेबिनारचे आयोजन
Posted On:
28 OCT 2021 4:53PM by PIB Mumbai
मुंबई, 28 ऑक्टोबर 2021
स्वच्छता ही एक दिवस करण्याची बाब नाही तर आपल्या निसर्गावरील निरंतर प्रेमाची प्रक्रिया आहे. आपल्या देशाच्या राज्यघटनेतील कलम 15 अतिशय स्पष्टपणे आपल्या सभोवतालचा परिसर आणि देश स्वच्छ ठेवून निसर्गाचा आदर करण्याचे आपले कर्तव्य सूचित करते, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्राने चॅम्पियन ऑफ अर्थ या पुरस्काराने नावाजलेले अफरोज शाह यांनी केले. 'स्वच्छ भारतासाठी योग्य वर्तन' या आझादी का अमृत महोत्सवा निमित्त ‘पत्र सूचना महाराष्ट्र, कार्यालयाने आयोजित वेबीनारमध्ये ते बोलत होते. 'तुम्ही जगात जो बदल पाहू इच्छिता तो प्रथम स्वतः आचरणात आणा असा संदेश या वेबीनार मधून देण्यात आला.

आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम आपण ज्या टप्प्यावर कचरा निर्माण करणार आहोत त्या टप्प्यापासून सुरू होते. आपण स्वतःला स्वतःच्या व्यवसायाने सहजपणे ओळखतो परंतु आपण स्वतःचा एक प्रजाती म्हणून विचार करत नाही त्यामुळे आपण इतर प्रजातींच्या वेदनांची कल्पना करू शकत नाही असे अफरोज शाह पुढे म्हणाले.
आपण आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास सक्षम असलो तरी सरकारने हे आपल्यासाठी करावे अशी आपली अपेक्षा असते. परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्या पर्यावरणाची स्वच्छता आणि काळजी घेण्याची प्रक्रिया ही आपल्याला राष्ट्रासोबत एक मोठी जोडणारी शक्ती असू शकते असे त्यांनी सांगितले .
जर तुमचे तुमच्या देशावर प्रेम असेल, तर कचरा निर्माण करणाऱ्यांबद्दल तुम्हाला राग येणार नाही, उलट तुम्ही देश स्वच्छ करण्याच्या मार्गांचा विचार करू शकाल, असे शाह म्हणाले .
प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर चक्रीय अर्थव्यवस्था हा उपाय आहे आणि प्लास्टिकचा वापर कमी करून आपण ते साध्य करू शकतो. धोरणकर्त्यांनी कचऱ्याबाबत पूर्व-कचरा पातळीपासून विचार सुरू केला पाहिजे आणि उत्पादकांच्या विस्तारित दायित्वासाठी आराखडा तयार केला पाहिजे, असा सल्ला शाह यांनी दिला.

मुंबई महानगर पालिका आणि इतर कार्यालयांच्या मदतीने आम्ही स्वच्छता मोहीम राबवली जिची सुरुवात केंद्रीय मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी केली. आहे मुंबईतील ताज हॉटेलसमोरही प्लास्टिकचा कचरा सापडला हे आमच्यासाठी अकल्पनीयच होतं असे नेहरू युवा केंद्र संघटनेच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक प्रकाश मनुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले . जपान प्रति व्यक्ती 7 किलो प्लास्टिक वापरत असला आणि आपण फक्त 500 ग्रॅम प्लास्टिक वापरत असलो तरीही जपान आपल्या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन आपल्यापेक्षा चांगले करतो असे ते म्हणाले .
युनिसेफ वॉश (Water, Sanitation and Hygiene)चे महाराष्ट्रातील अधिकारी, आनंद घोडके यावेळी म्हणाले की, पंतप्रधानांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांच्यामुळे स्वच्छता अभियान जनआंदोलन बनले आहे. स्वच्छता ही आपली संस्कृती असली तरी त्याची व्याप्ती यापूर्वी मर्यादित होती.”
“स्वच्छता सर्वत्र आहे. स्वच्छतेची व्याख्या सोपी आहे, याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक गोष्ट तीच्या निश्चित ठिकाणी असावी, चांगल्या स्वच्छतेसाठी वर्तन शाश्वत असावे लागते. आपण केवळ काही महामारी दरम्यान योग्य वागणूक राखून निरोगी राहण्याची अपेक्षा करू शकत नाही, असे घोडके म्हणाले.
केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकार यांच्या मदतीने युनिसेफ ही स्वच्छता मोहीम राबवत आहे. महाराष्ट्रात आम्ही संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान या नावाने गेली 20 वर्षे मोहीम राबवत आहोत अशी माहिती घोडके यांनी दिली.
सरकार योजना सुरू करू शकते परंतु नागरिक, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमा पुढे नेल्या पाहिजेत, असे मत श्री घोडके यांनी व्यक्त केले.
पत्र सूचना कार्यालयाच्या श्रीमती धनलक्ष्मी यांनी सूत्रसंचालन केले.
JPS/MC/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767222)
Visitor Counter : 439