नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जेएनपीटी बंदरात 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत कंटेनर वाहतुकीत 40.40% इतकी वाढ नोंदवली

Posted On: 14 OCT 2021 2:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  14 ऑक्टोबर 2021

भारतातील प्रमुख कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी मध्ये आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत कंटेनर वाहतूकीमध्ये 40.40% ची वाढ झाली. जेएनपीटी बंदरात आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत 2,703,051 टीईयू इतकी हाताळणी केली गेली जी वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहमाहीतील 1,925,284 टीईयूच्या तुलनेत 40.40% अधिक आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत वाहतूक हाताळणीमध्ये रेल्वेचा हिस्सा 18.04%होता. सप्टेंबर 2021 मध्ये एकूण 452,108 टीईयू कंटेनर हाताळणीझाली जी सप्टेंबर 2020 च्या तुलनेत 18.86% अधिक आहे. जेएनपीटी बंदरातील एनएसआईजीटी ने सप्टेंबर 2021 मध्ये 1,00,814 टीईयूची हाताळणी करून एका महिन्यात 1 लाख टीईयू कंटेनर हाताळणीकरण्याचा विक्रम केला, जो एनएसआईजीटीच्या स्थापनेनंतर आतापर्यंतची सर्वाधिक हाताळणी  आहे.

जेएनपीटी बंदराच्या पहिल्या सहामाहीतील कामगिरीविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी  म्हणाले, जगातील प्रगत व आघाडीच्या बंदरांच्या बरोबरीनेग्राहकांना सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आम्ही विविध उपाययोजना केल्या आहोत व करीत आहोत. अलीकडेच, केंद्रीय बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जेएनपीटीमधून ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवेचा शुभारंभ केला. ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवा ही आयात-निर्यात मालाची रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे सेठी  म्हणाले . ही सेवा सुरू झाल्याने अंतर्देशीय वाहतूक खर्च कमी होवून आयात-निर्यात समुदाय स्पर्धात्मक दराने आपल्या मालाची वाहतूक करू शकतात . यासोबतच जेएनपीटीमध्ये रेल्वे-मालवाहतूकीमध्ये सुद्धा वाढ होईल. त्याचप्रमाणे, तंत्राज्ञानाच्या आघाडीवर विविध उपाय योजने अंतर्गत आम्ही एनएसआयसीटी आणि एपीएमटी येथे दोन मोबाईल एक्स-रे स्कॅनर बसवले आहेत ज्यामुळे संशयास्पद कंटेनर बंदरा बाहेर जाण्याअगोदरच सुरक्षा एजन्सीं योग्य कारवाई करू शकतील व पर्यायाने आमच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. प्रत्येक टर्मिनलसाठी स्वतंत्र स्कॅनर उपलब्ध झाल्यामुळे इम्पोर्ट ड्वेल टाईम सुद्धा लक्षणीरित्या कमी होईल असे सेठी यांनी सांगितले .

जेएनपीटी सागरी व्यापार व वाहतूक क्षेत्रात नवनवीन कल्पना आमलात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून भारताच्या विकास यात्रेस गति देण्यासाठी सातत्याने विकासाचे नवनवीन मार्ग निर्माण करीत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या कोस्टल बर्थमुळे किनारपट्टीवरील मालवाहतुकीस चालना मिळेल आणि किनारपट्टीवरील जहाजवाहतुकीसाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध होईल. किनारपट्टीवरील मालवाहतुकीसाठी कोस्टल बर्थची सुविधा उपलब्ध झाल्याने रेल्वे आणि रस्ते मार्गावरील वाहतूकीचा ताण कमी होवून एक किफायतशीर व प्रभावी मल्टी-मोडल वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे. या व्यतिरिक्त, जेएनपीटीने बंदर आधारित औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी जेएनपीटी-सेझमधील 9 भूखंडांच्या यशस्वी बोलीदारांना आशयपत्र प्रदान केले आहे. भारताला ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनवण्याच्या उद्देशाने आघाडीच्या जागतिक कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी जेएनपीटीने आपल्या एसईझेडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. केंद्रीय पार्किंग प्लाझा (सीपीपी)च्या कामकाजाची व पुरवठा साखळीसाठी आवश्यक रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही जेएनपी-सीपीपी ॲप सुद्धा सुरू केले आहे.

 

Jaydevi PS/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1763870) Visitor Counter : 97


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil