उपराष्ट्रपती कार्यालय

वेगवान पायाभूत सुविधा विकास ही ईशान्य प्रदेशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे :उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींनी आभासी पद्धतीने नागालँडमधील विविध इमारती आणि सुविधांचे उद्‌घाटन केले

Posted On: 07 OCT 2021 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7  ऑक्टोबर 2021

उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आज ईशान्य प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी या भागात वेगवान पायाभूत सुविधा विकास आणि संपर्क वाढविण्यासाठीच्या प्रकल्पांची आवश्यकता विषद केली.

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, या प्रदेशातील जगणे अधिक सुलभ होण्यासाठी, व्यापार वृद्धी, शालेय शिक्षणविषयक निष्कर्ष, आरोग्य निर्देशांक, सुरक्षाविषयक परिस्थिती यांच्यात सुधारणा करण्यासाठी आणि या भागाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्याने अर्थव्यवस्थेला अनेक प्रकारचे लाभ होतात असे त्यांनी पुढे सांगितले.

नागालँडमधील माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार संचालनालयाची कार्यालय इमारत, काही सरकारी माध्यमिक शाळांच्या इमारती आणि कोहिमा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानांचे संकुल यांचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती बोलत होते. ईशान्य प्रदेशाच्या दौऱ्यावर असलेल्या नायडू यांचे आज नागालँड येथे आगमन झाले.

एसडीजी इंडिया निर्देशांक 2021 मधील शाश्वत विकास ध्येय निर्देशांकाचा उल्लेख करून नायडू यांनी ‘लिंग समानता’, ‘सन्मान्य काम आणि आर्थिक विकास’ तसेच ‘भूप्रदेशावरील जीवन’ या काही निर्देशांकांच्या संदर्भातील नागालँडने करून दाखविलेल्या उत्तम कामगिरीचे कौतुक केले. आरोग्य आणि स्वास्थ्य, उद्योग, अभिनव संशोधन आणि पायाभूत सुविधा या निर्देशांकांच्या बाबतीत अधिक सुधारणा व्हायला हवी असे ते म्हणाले. संपूर्ण देशात, महिलांच्या बाबतीतील सर्वात कमी गुन्हे घडणारे राज्य म्हणून त्यांनी नागालँडचे कौतुक केले.

पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये संपूर्ण पारदर्शकतेच्या अंमलबजावणीचा आग्रह धरत उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की भ्रष्टाचार हा विकासाचा शत्रू असल्यामुळे भ्रष्टाचार अजिबात सहन करता कामा नये.

महामारीच्या कालावधीत कृषी क्षेत्राने अत्यंत उत्तम कामगिरी करून दाखविली असे निरीक्षण नोंदवत कृषी क्षेत्राला अधिक फलदायी आणि किफायतशीर बनविण्यासाठी या क्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात तंत्रज्ञान यायला हवे अशी सूचना उपराष्ट्रपतींनी केली. ते म्हणाले की शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात लाभ मिळण्याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी कोहिमा येथील नुकतेच उद्घाटन झालेल्या मृदा परीक्षण प्रयोगशाळेसारख्या सुविधा वापरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.

प्रगतीसाठी शांतता ही आवश्यक पूर्वअट आहे यावर भर देत उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की प्रगती करण्यासाठीचा तो एकमेव मार्ग आहे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1761899) Visitor Counter : 48