उपराष्ट्रपती कार्यालय

ईशान्येकडील प्रदेशांना गतिमान विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचे उपराष्ट्रपतींचे ईशान्य परिषदेला आवाहन


ईशान्य प्रदेश मागे राहिला तर भारत मागे राहीलः उपराष्ट्रपती

सामाजिक विकासाच्या संदर्भातील तफावत कमी करण्यावर भर देण्याची उपराष्ट्रपतींची ईशान्य परिषदेला सूचना

Posted On: 04 OCT 2021 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्टोबर 2021

 

प्रगतीमध्ये अडथळा ठरणाऱ्या मुद्यांचे तातडीने निराकरण करून ईशान्य प्रदेशांना गतिमान विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ईशान्य परिषदेला केली आहे. ते आज शिलॉन्ग येथे ‘ईशान्य प्रदेशाच्या विकासात ईशान्य परिषदेची भूमिका’ या विषयावर आयोजित कार्यशाळेला संबोधित करत होते. विविध प्रदेशांमध्ये असमतोल प्रगती झाली तर भारताची प्रगती पूर्ण होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जर ईशान्य प्रदेशाचा विकास झाला तर भारताचा विकास होईल जर हा प्रदेश मागे राहिला तर भारत मागे राहील असे त्यांनी नमूद केले. ईशान्येकडील राज्यांनी विविध क्षेत्रांमधील सर्वोत्तम पद्धतींची परस्परांमध्ये देवाण-घेवाण करावी आणि आपापल्या राज्यांसाठी लाभ मिळवावेत अशी देखील सूचना त्यांनी केली. भारताने टीम इंडिया म्हणून काम केले पाहिजे.

केंद्र, राज्ये आणि स्थानिक शासन संस्था यांनी विकास विषयक मुद्यांवर उपाययोजना एकत्रितपणे शोधल्या पाहिजेत अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामगिरीत आणि उत्पादकतेमध्ये सुधारणेचे उद्दिष्ट निर्धारित करून, सरकार सर्व क्षेत्रांमधील सुधारणांच्या मार्गावर वाटचाल करत आहे असे ते म्हणाले. व्यवसाय सुलभ करणे आणि राहणीमान सुलभ करणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत असे नायडू म्हणाले. कामाची निकड लक्षात घेऊन काम करणे हा प्रमुख निकष बनला आहे, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष देश साजरा करत असताना आणि पुढील 25 वर्षांसाठी नियोजन करत असताना आणि निरोगी, सुशिक्षित, कुशल आणि समावेशक आत्मनिर्भर भारताची उभारणी करताना, आपल्याला गरिबीचे उच्चाटन करण्यावर, भेदभाव दूर करण्यावर, शहर आणि गाव यामधील विकासाची दरी कमी करण्यावर, शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर आणि सार्वजनिक आरोग्यविषयक पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

आपला भारत आकांक्षी भारत आहे आणि साडेचार कोटी लोकसंख्या असलेला अतिशय सचेतन असा, ईशान्य प्रदेश आपली स्वतःची स्वप्ने साकार करण्यासाठी सज्ज आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ईशान्य परिषद एक प्रभावी साधन ठरेल. ही परिषद त्यासाठी धोरण तयार करेल, नियोजन करेल, चालना देईल आणि योग्य त्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार सोबत समन्वय राखील असे त्यांनी नमूद केले.

ईशान्य प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ईशान्य परिषदेची स्थापना अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी यावेळी काही महत्त्वाच्या कामगिरीचे दाखले दिले. अकरा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची उभारणी दहा हजार तीनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या वीज वाहक तारांची जोडणी आणि प्रतिष्ठेच्या संस्थांची उभारणी यांचा त्यात समावेश होता. गेल्या सहा सात वर्षात या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेल्या लक्षणीय बदलाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला या भागातील सर्वच राज्यांमधील दरडोई राज्य स्थानिक उत्पादने यात उल्लेखनीय वाढ झाली आहे असे त्यांनी सांगितले. आर्थिक आणि मानव विकास विषयक बाबींमध्ये एकंदर विकास झालेला असताना सामाजिक आर्थिक विकासामध्ये असलेली तफावत भरून काढण्यासाठी परिषदेने काम केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी 2021-22 मध्ये नीती आयोगाने प्रसिद्ध केलेला ईशान्य प्रदेश सामाजिक विकास उद्दिष्ट निर्देशांक स्पष्ट निर्देश देत आहे, असे ते म्हणाले.

प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यक ती पावले उचलण्यासाठी हा निर्देशांक एक प्रभावी साधन ठरेल, असे ते म्हणाले. परिषदेने या आकडेवारीचे विश्लेषण करावे आणि सध्याची आणि नव्याने निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेऊन त्यांना तोंड देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. या प्रदेशातील युवक देशाच्या इतर भागातील त्यांच्याच वयाच्या इतर युवा बांधवांप्रमाणेच देशाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज आहेत. त्यांना संधी आणि प्रोत्साहन देण्यासाठी ठोस कृती केली पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

 

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1760941) Visitor Counter : 227