संरक्षण मंत्रालय
संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार यांनी 2022 च्या प्रजासत्ताक दिन सोहोळ्यासाठीच्या संकेतस्थळाचे केले उद्घाटन
Posted On:
04 OCT 2021 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2021
महत्त्वाचे मुद्दे:
- प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशभरात आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे प्रदर्शन करण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त
- प्रजासत्ताक दिनाच्या सोहोळ्याबद्दल माहिती देणारा हा एकमेव अधिकृत स्त्रोत असेल.
स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृतमहोत्सव अर्थात भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असताना, 2022 सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहोळ्याचे प्रदर्शन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने www.indianrdc.mod.gov.in. हे नवे संकेतस्थळ सुरु केले आहे. संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार यांनी आज 04 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे संपूर्ण जगातील भारतीयांना एकमेकांशी जोडून भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठीचा मंच म्हणून या संकेतस्थळाची औपचारिक सुरुवात केली.
याप्रसंगी बोलताना डॉ.अजय कुमार म्हणाले की प्रजासत्ताक दिन सोहोळ्याशी संबंधित विविध उपक्रम देशभरात हाती घेतले जात आहेत आणि या उपक्रमांना एकत्रितपणे दर्शविण्यासाठी हे संकेतस्थळ खूप उपयुक्त ठरणार आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरासाठीची निवड प्रक्रिया यापूर्वीच सर्व विभागांमध्ये सुरु झाली आहे आणि त्यात लाखो युवक सहभागी होत आहेत. या नव्या संकेतस्थळावर यासंदर्भातील सर्व घडामोडींबद्दल माहिती उपलब्ध असेल. “प्रजासत्ताक दिन शिबिराची पूर्वतयारी हा मुळातच एक उत्सव आहे. नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण या सर्व उत्सवांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहोत,” असे डॉ. अजय कुमार म्हणाले.
हे संकेतस्थळ म्हणजे प्रजासत्ताक दिन सोहोळ्याशी संबंधित सर्व प्रकारच्या माहितीचा एकमेव अधिकृत स्त्रोत असेल. संकेतस्थळामध्ये आरडीसी रेडियो, दालन, परस्पर संवादी फिल्टर्स, ई-पुस्तक, भारतीय स्वातंत्र्य चळवळीबाबत लेख असलेला ब्लॉग, युद्धे आणि युद्धस्मारकांची माहिती इत्यादी उपलब्ध असेल. तसेच, या संकेतस्थळावर प्रजासत्ताक दिन सोहोळ्यातील दर मिनिटाचे कार्यक्रम, मार्गाचा नकाशा, पार्किंगबद्दलचे तपशील, आरएसव्हीपी, संरक्षण मंत्रालयाच्या विविध विभागांनी हाती घेतलेल्या अतिरिक्त उपक्रमांचे तपशील, कार्यक्रमाचे थेट प्रसारण इत्यादीबद्दल सर्व माहिती उपलब्ध असेल.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760940)
Visitor Counter : 368