नौवहन मंत्रालय

भारताला नौवहन क्षेत्रातील प्रमुख जागतिक केंद्र बनवण्यासाठी सरकार प्रयत्नरत-केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल


2022 पर्यंत 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य साध्य करणार- सर्वानंद सोनोवाल  

2030 पर्यंत जगात नौवहन क्षेत्राला सर्वात उंचीवर नेण्याचे पंतप्रधांचे व्हिजन-केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर

केंद्रीय नौवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिरक महोत्सवाची सांगता

Posted On: 03 OCT 2021 6:51PM by PIB Mumbai

 

मुंबई, 03 ऑक्टोबर  2021

 

शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गेल्या सहा दशकात जगाच्या नकाशावर स्वतःची ओळख करण्यात यश मिळवले आहे. पंतप्रधानांचे व्हिजन आहे वाहतूकीतून परिवर्तन (Transformation through transportation) घडवून आणणे. याकामी शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मोठी भूमिका आहे. आगामी काळात याची ताकद आणखी वाढवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले. शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या हिरक महोत्सवाचा आज सांगता सोहळा संपन्न झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बंदरे, नौवहन आणि राज्यमंत्री शांतनू ठाकूर, खासदार मनोज कोटक, शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष श्रीमती एच.के.जोशी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांची उपस्थिती होती.

भारताला नौवहन क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. त्यानूसारच पंतप्रधानांनी घालून दिलेले 2022 पर्यंत 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य साध्य करणार असल्याचे सर्वानंद सोनोवाल म्हणाले. यासाठी सर्व मंत्रालय, निर्यातदार एकजुटीने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई देशातील प्रमुख केंद्र आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखले जाते. शिपींग कॉर्पोरेशनची यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने महिला शक्तीचे उदाहरण दाखवून दिले आहे. यामुळे आगामी काळात या क्षेत्राकडे महिला आणखी मोठ्या प्रमाणात वळतील, असे मंत्री म्हणाले. आजच्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन स्वतः शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने करुन आत्मनिर्भरतेचे उदाहरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जलदरित्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, असे याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले.

पंतप्रधानांनी घालून दिलेल्या आदर्शनानूसार सेवा बजावली पाहिजे. शिपींग कॉर्पोरेशने गेल्या सहा दशकांत केलेल्या कामाचे सर्वानंद सोनोवाल यांनी कौतुक केले. आगामी काळात सागरी क्षेत्र विकासासाठी काम करण्याची मोठी संधी आहे, असे ते म्हणाले.

राज्यमंत्री शंतनू ठाकूर याप्रसंगी बोलताना म्हणाले, 2030 पर्यंत जगात नौवहन क्षेत्राला सर्वात उंचीवर नेण्याचे पंतप्रधांचे व्हिजन आहे. देशातील प्रमुख बंदरांचा विकास करणे. बंदरांना आंतरराष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. नौवहन क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येईल. देशांतर्गत जलमार्ग हा पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या क्षेत्राला चालना मिळाल्यास कमी खर्चात मालवाहतूक सुविधा पोहचवणे सुलभ होईल.

एससीआयच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे शंतून ठाकूर म्हणाले. 

शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एम टी स्वर्ण-कृष्णा हे जहाज पूर्णपणे महिला चमूद्वारे संचलित केले. या चमूचा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आर्थिक अडचणी असतानाही शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवोन्मेषी उपाययोजनांच्या माध्यमातून सागरी क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केल्याचे शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष श्रीमती एच के जोशी म्हणाल्या.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहा दशकांच्या कार्याचा आढावा घेणारे कॉफी टेबल बुक प्रकाशिक करण्यात आले. तसेच कांडला बंदराहून निर्यात जहाज एम व्ही एससीआय चेन्नईला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक (बल्क कॅरिअर आणि टँकर) अतुल उबाळे यांनी आभारप्रदर्शन केले.  

2 ऑक्टोबर 1961 रोजी स्थापन करण्यात आलेली शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आज सर्वात मोठी भारतीय नौवहन कंपनी आहे. 2008 मध्ये सरकारने शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला “नवरत्न: दर्जा प्रदान केला.

शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सांगता सोहळा कार्यक्रम - https://www.youtube.com/watch?v=BD4Vbw_RHlw

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1760631) Visitor Counter : 223


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi