सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांनी इंडिया एक्स्पोर्ट उपक्रम आणि इंडिया एक्सपोर्टस 2021 पोर्टलची सुरुवात केली
Posted On:
29 SEP 2021 7:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2021
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज नवी दिल्ली येथे आभासी पद्धतीने इंडिया एक्स्पोर्ट उपक्रम आणि इंडिया एक्सपोर्टस 2021 पोर्टल ऑफ इंडिया एसएमई मंचाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या मदतीने भारताची निर्यात वाढेल, या आर्थिक वर्षात 400 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य गाठता येईल आणि 2027 सालापर्यंत देशाच्या निर्यातीने 1 ट्रिलीयन इतक्या निर्यातीचे आव्हानात्मक लक्ष्य गाठलेले असेल असा विश्वास याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री राणे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की निर्यातीत वाढ आणि स्थानिकीकरण सुनिश्चित करण्यासाठी भारताचा उत्पादनसंबंधित पाया सुधारून देशाला जागतिक पातळीवरील उत्पादनाचे उर्जाकेंद्र बनविणे आवश्यक आहे. भारतातील स्पर्धात्मक लाभांमध्ये वाढ करून आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या स्पर्धात्मकतेत वाढ करून हे लक्ष्य साध्य करता येईल आणि त्यायोगे भारताला जगामध्ये उत्पादनासाठी प्राधान्य दिला जाणारा देश म्हणून स्थापित करता येईल.केंद्रीय मंत्री म्हणाले की व्यापारातील तूट कमी करण्यासाठी आणि आयातीचे प्रमाण घटविण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतील आणि या उद्योगांच्या निर्मिती क्षमतांमध्ये वाढ करून हे साध्य करता येईल. ते पुढे म्हणाले की, याबाबतीत समग्र दृष्टिकोनाचा स्वीकार करून भारताला जागतिक दर्जाचे निर्मिती केंद्र आणि प्रमुख निर्यात केंद्र म्हणून स्थान मिळविता येईल.
केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा यांनी उपस्थितांना सशक्त व्यापार आणि निर्यातीमुळे जागतिक व्यापारामध्ये जेव्हा भारताचा मोठा सहभाग होता त्या काळाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातून होणारी निर्यात भारताच्या अर्थव्यवस्थेची सशक्तता पुन्हा प्राप्त करून देण्यात उत्प्रेरकाची भूमिका बजावणार आहे. भारताच्या समग्र भूमीवर विस्तारित 63 दशलक्ष सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांचा भारताच्या एकूण निर्यातीत 40% वाटा आहे, हे उद्योग देशाच्या उत्पादनविषयक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात 6.11% चे आणि सेवा क्षेत्रातील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात 24.63% इतके योगदान देतात.
निर्यात करू शकणारे सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग वाढविणे, या उद्योगांकडून होणारी निर्यात 2022 पर्यंत 50% नी वाढविणे आणि पंतप्रधानांच्या 5 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावणे यासाठी विद्यमान शुल्क व्यवस्थेत आतापर्यंत न वापरलेल्या निर्यात क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या तसेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडियाएक्सपोर्टस हा मोफत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
यामध्ये एक माहिती पुरविणारे पोर्टल असून ते भारतातील सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना आवश्यक असलेल्या सर्व 456 निर्यात मार्गांच्या निर्यात क्षमतेविषयी, निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व बाजारांविषयी तसेच निर्यातीतील पद्धती, निर्यात प्रक्रिया आणि इतर अनेक बाबींबद्दल निर्यातविषयक माहितीचा पाया पुरविते. निर्यातविषयक मदत पुरविण्यासोबतच, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायिकांना विशिष्ट क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनाच्या निर्यातीला आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये असलेल्या संधी ठळकपणे दाखवून देणाऱ्या सत्रांच्या मालिकेचे प्रशिक्षकासह आयोजन केले जाणार आहे. निर्यातीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या 1 लाखांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना या उपक्रमाचा लाभ मिळवून देण्याचे तसेच 30,000हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना निर्यात सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सक्रीय निर्यातदारांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759431)
Visitor Counter : 411