युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचा दोन दिवसीय गांदरबल दौरा समाप्त
केंद्रशासित प्रदेशात क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध : अनुराग ठाकूर
Posted On:
27 SEP 2021 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2021
ठळक वैशिष्ट्ये:
- केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली विविध क्रीडा प्रतिनिधी मंडळांची भेट, यात विविध क्रीडा प्रकारातील माजी खेळाडू, प्रशिक्षक, विद्यमान खेळाडू आणि उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश
- केंद्र सरकारने पंतप्रधान विकास योजनेअंतर्गत संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये मैदाने आणि इनडोअर स्टेडियम्स बांधण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे: क्रीडामंत्री
केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा जम्मू काश्मीरमधील गांदरबल चा दोन दिवसीय दौरा आज समाप्त झाला.
या दौऱ्यात ठाकूर यांनी विविध क्रीडाप्रतिनिधी मंडळांची भेट घेतली. यात अनेक खेळांचे माजी खेळाडू, प्रशिक्षक, विद्यमान खेळाडू आणि उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश होता.
जम्मू काश्मीर मध्ये सध्या उपलब्ध असलेल्या क्रीडाविषयक सुविधांची माहिती, या प्रतिनिधीमंडळांनी यावेळी ठाकूर यांना दिली.तसेच संपूर्ण केंद्रशासित प्रदेशातच क्रीडा संस्कृतीचा आणखी विकास करण्यासाठी काही मागण्या त्यांनी सादर केल्या. यात, जम्मू काश्मीर मध्ये क्रीडा उद्योग सुरू करण्यासह, सध्याच्या क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणे, तालुका स्तरावर इनडोअर बहुउद्देशीय प्रशिक्षण सभागृहे उभारणे, खूप उंचावरील प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे इत्यादी मागण्या होत्या.
या प्रतिनिधीमंडळाशी बोलतांना ठाकूर यांनी सांगितले की केंद्र सरकार देशात क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करण्यास कटिबद्ध आहे. पंतप्रधान विकास योजनेअंतर्गत, संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये खेळाची मैदाने आणि इनडोअर स्टेडियम उभारण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
खेलो इंडिया योजनेअंतर्गत केंद्रशासित प्रदेशात 40 केंद्रे सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे असे सांगत, या केंद्रात युवकांना त्यांच्या कौशल्ये आणि आवडीनुसार क्रीडा प्रशिक्षण दिले जाईल. त्याशिवाय खेळाडूंना खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी इतरही अनेक कार्यक्रमांचा विचार सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.
प्रतिनिधी मंडळांनी केलेल्या मागण्यांविषयी बोलतांना ते म्हणाले की देशात आज लोक क्रीडाक्षेत्राकडे लक्ष देत आहेत ही उत्साहवर्धक बाब आहे या प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या हिवाळी आणि उन्हाळी खेळांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नायब राज्यपालांचे सल्लागार फारुख अहमद खान, डीडीसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह इतर मान्यवर आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758808)
Visitor Counter : 192