आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आगामी सणावारांच्या काळात कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व सांगणाऱ्या संदेशाचा देशभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची विविध रेडीओ केंद्रांशी संवादात्मक कार्यशाळा
सणासुदीच्या काळात कोविड प्रतिबंधात्मक प्रोटोकॉलसह व्यापक लसीकरण देखील होणे गरजेचे: लव अग्रवाल, सहसचिव, आरोग्य मंत्रालय
Posted On:
24 SEP 2021 9:07PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने युनिसेफशी भागीदारी करत, आकाशवाणी आणि देशातील इतर सर्व खाजगी एफएम आणि कम्युनिटी रेडीओ वाहिन्यांच्या प्रतिनिधींसोबत एक संवादात्मक चर्चासत्र आयोजित केले होते. आगामी सणासुदीच्या काळात, कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याच महत्त्व सांगणारे संदेश व्यापक स्तरावर जनतेपर्यंत पोचवण्याचे नियोजन करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांचे सुमारे 150 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.
या सर्व वाहिन्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या असून त्यांचा श्रोतृवर्गही मोठा आहे. अगदी शहरी भागांपासून, ग्रामीण आणि दुर्गम भागातही रेडीओचे अस्तित्व आणि लोकप्रियता आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, यांनी या चर्चासत्रात, सर्वांशी संवाद साधला. जनहिताचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात माध्यमांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. भारताने, अत्यंत विक्रमी वेळात कोविड रुग्णसंख्याआटोक्यात आणली आहे. टेस्ट-ट्रॅक-ट्रीट ही त्रिसूत्री आणि लसीकरण धोरणातून कोविड संसर्गावर नियंत्रण मिळवता आले आहे, असे सांगत, लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी नागरिकांचेही कौतुक केले.
मात्र, देशभरात कोविड रुग्णांची संख्या कामी होत असली तरीही या विषाणूचे अस्तित्व कायम आहे आणि म्हणूनच या घडीला कोणत्याही चुकीच्या किंवा बेसावध वर्तनाने रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा त्यांनी दिला. “लवकरच देश 100 कोटी मात्रांच्या लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे. या विषाणूविरुद्धच्या लढ्यात विजय दृष्टीपथात असला, तरी गाफील राहून किंवा निष्काळजीपणा मुळे किंवा थकव्यामुळे आपण मोठ्या कष्टाने कोविडविरोधात आपल्या हातातोंडाशी आलेला विजय, हातातून निसटू देता कामा नये. आणि म्हणूनच येत्या सणासुदीच्या काळातही कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात आळस करू नये.” असे आवाहन अग्रवाल यांनी केले. दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणूनच आपण उत्सव साजरे करतो. हे लक्षात ठेवत कोविड महामारीचा अंत करण्यासाठी आपण प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही ते पुढे म्हणाले.
या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींनी हा संदेश व्यापक प्रमाणात घराघरात पोचवावा.लसींच्या दोन्ही मात्रा घेण्याचे महत्त्व, आणि कोविड नियमांचे पालन याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. या संदेश अधिकाधिक प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी, काही अभिनव पद्धती वापराव्या, तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
आरोग्य मंत्रालयासह, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि युनिसेफचे प्रतिनिधीही या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
***
S.Patil/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757872)
Visitor Counter : 222