सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय उद्या ‘सांकेतिक भाषा दिन’ साजरा करणार


‘भारतीय सांकेतिक भाषेचा प्रवास’ यावरील माहितीपट यावेळी सादर केला जाणार

डॉ वीरेंद्र कुमार चौथ्या भारतीय सांकेतिक भाषा स्पर्धा, 2021 च्या विजेत्यांशी संवाद साधणार

Posted On: 22 SEP 2021 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2021 


सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत दिव्यांग  व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीतील नवी दिल्लीस्थित भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (आयएसएलआरटीसी) ही  स्वायत्त संस्था उद्या डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, 15 जनपथ, नवी दिल्ली येथे 'सांकेतिक भाषा दिन' साजरा करणार आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार हे प्रमुख पाहुणे असतील आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री प्रतिमा भौमिक आणि ए. नारायणस्वामी मानद पाहुणे असतील. दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या सचिव  अंजली भावरा, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त  सचिव  संतोष सारंगी, दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाचे सहसचिव  आणि  आयएसएलआरटीसीचे संचालक डॉ.प्रबोध सेठ,  अखिल भारतीय कर्णबधिर महासंघाचे सरचिटणीस व्ही. गोपाल कृष्णन हे  देखील या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाने 23 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन  घोषित केल्यापासून, आयएसएलआरटीसी  दरवर्षी हा दिवस साजरा करत  आहे. भारतीय सांकेतिक भाषांचे महत्त्व आणि कर्णबधिर  व्यक्तींसाठी माहिती आणि संवाद सुगम्य करण्याबाबत सामान्य लोकांना जागरूक करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सांकेतिक भाषा केवळ लोकांना शिक्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावत नाही तर कर्णबधिर  व्यक्तींसाठी रोजगार संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण तयार करण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

या कार्यक्रमादरम्यान, भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र  'भारतीय सांकेतिक भाषेचा  प्रवास' यावर  एक माहितीपट सादर करेल, आणि 4 थ्या  भारतीय सांकेतिक भाषा स्पर्धा, 2021 च्या विजेत्यांची घोषणा करेल. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी ही राष्ट्रीय  स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सामाजिक  न्याय आणि सक्षमीकरण मंत्री यावेळी देशभरातील विविध भागांतील काही विजेत्यांसोबत त्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी थेट संवाद साधण्याची शक्यता आहे.

आयएसएलआरटीसीने कर्णबधिर मुलांना पाठ्यपुस्तके सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके  भारतीय सांकेतिक भाषेत (डिजिटल स्वरुपात) रुपांतरित करण्याबाबत  6 ऑक्टोबर, 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.   इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांचे  रुपांतर करण्याच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून  कार्यक्रमादरम्यान त्याच्या डिजिटल आवृत्तीचा शुभारंभ केला  जाईल.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757057) Visitor Counter : 266