पंतप्रधान कार्यालय

अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

Posted On: 22 SEP 2021 10:28AM by PIB Mumbai

अमेरिकेचे  अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार  मी 22 ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे.

माझ्या या दौऱ्यादरम्यान, अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर मी  भारत-अमेरिका  यांच्यातील  व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेणार आहे तसेच परस्पर  हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आम्ही आपली मते मांडू. विशेषत: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्ष  कमला हॅरिस यांचीही भेट घेण्यासाठी मी उत्सुक आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह पहिल्या क्वाड लीडर्स शिखर परिषदेत  मी व्यक्तिशः सहभागी होणार आहे.

या वर्षी मार्चमध्ये झालेल्या आभासी शिखर परिषदेच्या निष्कर्षांचा आढावा घेण्याची आणि हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आमच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित भविष्यातील सहभागाला प्राधान्य देण्याची  संधी या शिखर परिषदेच्या निमित्ताने मिळणार आहे.

मी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांचीही स्वतंत्रपणे  भेट घेणार असून  त्या दोन्ही   देशांशी असलेल्या भारताच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहे  आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची  उपयुक्त देवाणघेवाण करणार आहे.

दौऱ्याच्या शेवटी मी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत  भाषण करणार असून त्यात कोविड -19 महामारी, दहशतवादाचा सामना करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसह जागतिक स्तरावरील  आव्हानांवर माझ्या भाषणाचा भर राहील.

माझा हा अमेरिका दौरा हा  अमेरिकेबरोबर  व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे, जपान आणि ऑस्ट्रेलियाशी या सामरिक भागीदारांशी संबंध दृढ करणे याबरोबरच महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर  आमचे सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी असेल.

***

Jaydevi PS /SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756927) Visitor Counter : 779