कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत हे निरोगी खाद्य संस्कृतीचे केंद्र बनत आहे : नरेंद्र सिंह तोमर

Posted On: 19 SEP 2021 7:58PM by PIB Mumbai

 

लोकांच्या आहारात बाजरी, इतर पौष्टिक अन्नधान्ये, फळे आणि भाज्या, मासे, दुग्धजन्य आणि सेंद्रिय उत्पादने यासारखे पारंपारिक खाद्यपदार्थ पुन्हा खाद्यसंस्कृतीत आणण्यावर भारत सरकार भर देत आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. गेल्या काही वर्षांत या खाद्यपदार्थांचे अभूतपूर्व उत्पादन भारतात होत आहे आणि भारत निरोगी अन्नपदार्थ उपलब्ध होण्याचे स्थान बनत आहे, असेही तोमर म्हणाले. G-20 परिषदेतील कृषीमंत्र्यांच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात तोमर बोलत होते. शून्य उपासमारीचे ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र काम करणे:  कृषी मंत्रालयांनी या क्षेत्रात राबवलेले यशस्वी प्रकल्प,’  अशी या चर्चासत्राची संकल्पना होती.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या भाषणात तोमर म्हणाले की, पोषक-धान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने भारत सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे आणि 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी  वर्ष (International Millet year) म्हणून घोषित केले आहे. पोषक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजरी वर्ष साजरे करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोविड महामारीच्या काळातही भारतीय कृषी क्षेत्र प्रभावित झाले नाही, असे तोमर यांनी सांगितले.  2020-2021 यादरम्यान, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच निर्यातीतही  लक्षणीय वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.

बायोफॉर्टीफाइड-वाण, हे सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असलेले आहाराचे प्रमुख स्त्रोत आहेत असे त्यांनी सांगितले.  कुपोषण दूर करण्यासाठी या घटकांच्या शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. अशा विविध पिकांच्या 17 जाती विकसित करून त्या लागवडीखाली आणण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने पाण्याच्या स्त्रोतांचा सुयोग्य वापर वाढवण्यासाठी, सिंचनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, खतांच्या संतुलित वापराने जमिनीची सुपीकता जपण्यासाठी, शेतांपासून बाजारपेठांपर्यंत वाहतुकीचे जाळे सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत, असेही तोमर यांनी यावेळी सांगितले.

***

R.Aghor/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1756301) Visitor Counter : 231