गृह मंत्रालय
केंद्रीय सशस्त्र पोलीस बलातर्फे सुरु असलेल्या 'अखिल भारतीय वृक्षारोपण अभियान-2021'अंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या नांदेड इथे सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात 1 कोटी व्या वृक्षाचे रोपण केले
आपल्या सीआरपीएफने देशभरात 170 पेक्षा जास्त जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लावण्याचे कार्य केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी या उद्दिष्टाची पूर्तता होत आहे याचा आनंद आहे आणि मराठवाड्याच्या भूमीवर या उद्दिष्टाची पूर्तता होत आहे, जिथे गुरू गोविंद सिंह जी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हुज़ूर साहिब गुरुद्वारा आहे आणि आजच्याच दिवशी या भूमीला निजाम राजवटीपासून मुक्ती मिळाली होती
देशाचे पहिले गृहमंत्री आणि भारत रत्न सरदार पटेल यांनी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावत दृढता,आणि रणनीती कौशल्यासह हे संपूर्ण क्षेत्र अखंड भारताचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आजच्याच दिवशी यश मिळवले होते
हवामान बदला संदर्भात काम करण्यासाठी शासनाच्या वतीने एक संस्थात्मक व्यवस्था कशी असू शकते याची देशात सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली
अतिवृष्टी,दुष्काळ, भूस्खलन यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत असून याचे मूळ कारण हवामान बदल आहे
विकासाच्या वेगाबरोबरच जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यासंदर्भातली दखल व्यवस्थेत समाविष्ट करायला हवी
Posted On:
17 SEP 2021 6:32PM by PIB Mumbai
देशाचा विकास आणि देशाची अर्थव्यवस्था पांच ट्रिलियन डॉलरची करणे हे सीआरपीएफच्या समर्पण आणि महत्वपूर्ण योगदानाविना अशक्य आहे
केंद्रीय सशस्त्र पोलीस बलातर्फे सुरु असलेल्या 'अखिल भारतीय वृक्षरोपण अभियान-2021'अंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या नांदेड इथे सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या प्रशिक्षण केंद्रात 1 कोटी व्या वृक्षाचे रोपण केले.यावेळी सीआरपीएफचे महा संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जवानही उपस्थित होते. सर्व दलांनी एकत्र येऊन एक कोटी पेक्षा जास्त वृक्ष लागवडीचे आणि हे वृक्ष वाढेपर्यंत त्यांची जोपासना करण्याची वैज्ञानिक व्यवस्था करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते त्यांच्याच हस्ते इथे पिंपळाचे झाड लावण्यात आले आहे आणि एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करत आहोत याचा आनंद असल्याचे यावेळी बोलताना शहा म्हणाले. सीआरपीएफने देशभरात 170 पेक्षा जास्त जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लावण्याचे कार्य केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे आणि याच दिवशी हे उद्दिष्ट पूर्ण करत आहोत हे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी सांगितले की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि आजच आपण एक कोटी व्या वृक्षाची येथे लागवड केली आहे. त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नरेंद्र मोदी हे देशातील पहिले असे मुख्यमंत्री होते ज्यांनी हवामान बदलाच्या समस्येकडे लक्ष दिले, कारण त्या काळी जगात देखील या प्रश्नाकडे लक्ष देणाऱ्या अत्यंत कमी व्यक्ती होत्या. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम सरकारमध्ये हवामान बदल विभागाची निर्मिती केली. सरकारने हवामान बदलाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्याची भारतामध्ये ही पहिलीच वेळ होती. हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सरकारतर्फे संस्थात्मक प्रणाली अमलात आणण्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी सांगितले की हे वृक्षारोपण अशा जागी होत आहे जो मराठवाड्याचा भाग आहे, नांदेड, इथे गुरु गोविंद सिंह यांच्या स्मरणार्थ आज देखील हुजूर साहेब गुरुद्वारा आहे आणि आजच्याच दिवशी हा प्रदेश स्वतंत्र झाला होता. आजच्याच दिवशी, हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीच्या जोखडातून हा प्रदेश मुक्त झाला होता. देशाचे पहिले गृह मंत्री आणि भारत रत्न सरदार पटेल यांनी ठामपणे, धैर्याने आणि कुशल रणनीतीचा वापर करून निजामाचे नापाक इरादे हाणून पाडत हे संपूर्ण क्षेत्र अखंड भारताचा भाग म्हणून स्थापित करण्यात यश प्राप्त केले. आपणा सर्वांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहेच पण येथील रहिवाशांसाठी हा अधिकच महत्त्वाचा दिवस आहे, कारण संपूर्ण भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला पण हा भाग मात्र त्यानंतर 13 महिन्यांनी स्वतंत्र होऊ शकला. आणि या दृष्टीने विचार केला तर आजच या प्रदेशाचा स्वातंत्र्य प्राप्तीचा दिवस आहे. हा भाग स्वतंत्र करण्यासाठी अनेक महान व्यक्तींनी प्राणार्पण केले आणि हा लढा दिला. केंद्रीय मंत्री शहा म्हणाले की निजामाच्या क्रूर फौजांचा सामना करत स्वतंत्र झालेला हा भाग आज भारताचे अविभाज्य अंग आहे आणि यासाठी त्या सर्व आत्म्यांचे सर्वोच्च बलिदान देश कधीही विसरणार नाही.
केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की अनिर्बंध विकासकामांमुळे जागतिक पर्यावरणाची मोठी हानी झालेली आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हे दोन धोके प्रत्येक देशाचे शत्रू आहेत. ते म्हणाले की गेल्या काही काळापासून अतिवृष्टी, दुष्काळ, भूस्खलन यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत आणि यांचे मूळ कारण हवामान बदल हेच आहे. पृथ्वीचे तापमान सतत वाढत चालले आहे आणि याचे मुख्य कारण आहे अनिर्बंधपणे केलेला विकास. तसेच कार्बनच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीसभोवती असलेला ओझोनचा थर पातळ होऊ लागला आहे. या प्रक्रियेला जर आपण थांबविले नाही तर पृथ्वीवर मानवी जीवनाचे अस्तित्व टिकून राहणे कठीण होईल. त्यांनी सांगितले की वेगवान विकासासोबतच जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या समस्या सोडविण्याचा मुद्दा आपल्या प्रणालीत समाविष्ट करून घ्यावा लागेल आणि त्यासाठीचा सर्वात साधा उपाय म्हणजे कार्बनचे उत्सर्जन कमी करणे आणि उत्सर्जित कार्बनची योग्य प्रकारे व्यवस्था लावणे आणि त्यासाठी झाडांची संख्या वाढविणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे, झाडांकडून आपल्याला ऑक्सिजन मिळत राहील आणि ओझोनचा थर देखील सुरक्षित राहील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून यासाठी अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. गेल्या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे अभियान हाती घेण्यात आले आणि त्याअंतर्गत 1 कोटी 30 लाख वृक्ष लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. या अभियानात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांनी 1 कोटी 47 लाख वृक्षांची लागवड केली आणि आज देखील एक कोटी वृक्षांच्या लागवडीचे काम पूर्ण झाले आहे.
वृक्ष लागवड करून स्वतःला त्या एका झाडासोबत जोडण्याचं आवाहन श्री अमित शाह यांनी देशभरातील सीआरपीएफ आणि सीएपीएफ़ जवानांना केले.आणि सांगितले की, निर्मिती ही ईश्वराची सर्वात मोठी कृपा आणि कला आहे.त्यामुळे तुम्ही स्वतःला एका झाडाशी जोडून घेतले तर तुम्हाला त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होईल ,जी तुम्हाला आत्म समाधान देईल , तणाव कमी करेल आणि जीवन जगण्याचा एक सर्जनशील दृष्टीकोनसुद्धा देईल. झाड लावणे हा शासनाचा कार्यक्रम आहे, तो जिवंत ठेवणे, वाढवणे आणि रोपांचे झाडामध्ये रूपांतर करणे हा कार्यक्रम जवानांचा असायला हवा, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, धार्मिक दृष्टिकोनातून वृक्षाचे महत्त्व पुराण, उपनिषदे आणि वेदांमध्ये स्पष्ट केले आहे. दहा पुत्रांपेक्षा अधिक लाभ एक वृक्ष देतो असे पुराणांमध्ये नमूद करण्यात आले आहे. श्री अमित शाह म्हणाले की, जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्यांनी दीर्घायुषी असलेली अधिक झाडे लावावीत असा आग्रह केला होता, जेणेकरून पृथ्वीला त्याचा नंतर फायदा होऊ शकेल आणि त्यांच्या सूचनेनुसार लावलेल्या झाडांपैकी 60% पेक्षा जास्त झाडे 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत राहणारी आहेत.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की,या सीआरपीएफ प्रशिक्षण संस्थेत, नागरिकापासून संरक्षक तसेच सामान्य माणसापासून देशभक्त आणि सशस्त्र सेनानी तयार करण्याचे कार्य केले जाते आणि येथून तुम्ही तुमचे शिस्तबद्ध जीवन जगायला सुरुवात करता. 2000 पेक्षा जास्त सीआरपीएफ जवानांच्या बलिदानाचे स्मरण करून देताना ते म्हणाले की, त्यांच्या बलिदानामुळे आज आपला देश सुरक्षित आहे.जेव्हा खूप काही व्यवस्था नव्हत्या, तेव्हा 1959 मध्ये, भारत-चीन सीमेवर हॉटस्प्रिंग असो किंवा सरदार चौकी असो वा भुज, सर्व ठिकाणी शत्रूला प्रथम आव्हान देण्याचे काम सीआरपीएफने केले आहे, असे श्री. शाह यांनी सांगितले.
श्री अमित शाह म्हणले की, आधी सीआरपीएफवर देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी होती त्यानंतर दंगली रोखण्याची जबाबदारी आली नंतर नक्षलवाद्यांसमोर लढण्याची जबाबदारी आली किंवा ईशान्येकडे काम करण्याची, काश्मीरमध्ये काम करण्याची जबाबदारी आली, सीआरपीएफ जवानांनी प्रत्येक गरजेनुसार स्वत: ला त्या कार्यानुरूप बदलत प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचे चांगले काम केले आणि प्रत्येक आघाडीवर सीआरपीएफचा विजयाचा झेंडा अभिमानाने उंचावला.
बर्याच लोकांना ही अतिशयोक्ती वाटेल, मात्र सीआरपीएफ शिवाय देशाच्या अंतर्गत सुरक्षेची कल्पना केली जाऊ शकत नाही, हे वास्तव आहे , असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले.ते म्हणाले की, त्यांना आणि संपूर्ण राष्ट्राला सीआरपीएफ जवानांच्या त्यागाचा,बलिदानाचा आणि समर्पणाचा अभिमान आहे आणि देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सीआरपीएफच्या समर्पित आणि उल्लेखनीय योगदानाशिवाय देशाचा विकास आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
***
Jaydevi PS/S.Tupe/M.Chopade/NN.Chitale/S.Chitnis/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755854)
Visitor Counter : 237