राष्ट्रपती कार्यालय
‘समुद्र सेतू’ आणि ‘मिशन सागर’ अशा मोहीमांमधून भारतीय नौदलाने कोविड महामारीच्या काळात महत्वाचे योगदान दिले : राष्ट्रपती रामनाथ कोविन्द
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला राष्ट्रपतींचा ध्वज हा सन्मान प्रदान
Posted On:
06 SEP 2021 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2021
आशियाई प्रदेशाविषयीची भारताची कटिबद्धता पूर्ण करणे तसेच भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील मित्र आणि भागीदार देशांसोबतचे राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत भारतीय नौदलाने महत्वाचे प्रयत्न केले आहेत, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी काढले. ‘समुद्र सेतू’ आणि ‘मिशन सागर’ अशा मोहिमा पार पाडत कोविड-19 महामारीच्या काळातही नौदलाने महत्वाचे योगदान दिले आहे, हिंद महासागर परिसरातील देशांपर्यंत मदत पोचवण्याचे कार्य नौदलाने पूर्ण केले, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे. संकटकाळात भारतीय नौदलाने केलेली त्वरित आणि प्रभावी कामगिरी, हिंद महासागर क्षेत्रात, भारत एक ‘पसंतीचा संरक्षणविषयक भागीदार’ आणि ‘त्वरित प्रतिसाद देणारा देश,’ अशी आपली प्रतिमा अधोरेखित करणारी होती, असेही राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रपतींच्या हस्ते आज गोव्यात आयएनएस हंसा इथे भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला राष्ट्रपतींचा ध्वज (प्रेसिडेंट्स कलर) हा सन्मान प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रपतींनी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांचे आणि खलाशांचे अभिनंदन केले. या विभागाने युद्ध आणि शांतता अशा दोन्ही काळात, देशासाठी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
भारतीय नौदलाने आपत्ती व्यवस्थापन काळात मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या अनेक बचाव आणि मदत कार्याची राष्ट्रपतीनी प्रशंसा केली. मुंबईत मे महिन्यात आलेल्या तौते चक्रीवादळाच्या काळात, नौदलाने केलेल्या बचाव कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच, हिंद महासागर क्षेत्रातही, अनेक शेजारी देशांना नौदलाने केलेल्या सहाय्याचा त्यांनी उल्लेख केला.
भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांविषयी बोलतांना ते म्हणाले, नौदलाने, अत्यंत सक्रियपणे स्वदेशीकरण मोहीम हाती घेतली आहे. सध्याच्या आणि भविष्यातील योजनांमधून ही मोहीम प्रतिबिंबित होत आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला अनुसरून, नौदलाने मेक इन इंडियाला गती दिली आहे. हवाई तंत्रज्ञान, नौदलाची लढावू विमाने, यात अत्याधुनिक, अद्ययावत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्ससाठी भारतीय तंत्रज्ञान वापरले जात आहे.अलीकडेच नौदलात समाविष्ट करण्यात आलेली, अत्याधुनिक हलक्या वजनाची हेलिकॉप्टर्स तसेच हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेडने तयार केलेली डोर्नियर आणि चेतक लढावू विमाने, संरक्षण क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेचेच द्योतक आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752573)
Visitor Counter : 253