गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या (BPR&D) 51व्या स्थापना दिनाला आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांची  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती


सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण संस्थाना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी आणि बक्षिसांचे वितरण तसेच पोलीस प्रशिक्षणार्थींना पदकांचे वितरण

टोक्यो ऑलिंपिक 2020 मधील रौप्यपदक विजेती एस मीराबाई चानू हिचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

पोलीस संशोधन आणि विकास विभागाशिवाय चांगल्या पोलीस दलाची  कल्पनाही करता येत नाही

Posted On: 04 SEP 2021 10:25PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्ली येथे पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या एक्कावन्नाव्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, पोलीस संशोधन आणि विकास विभागाचे (BPR&D) महासंचालक, पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण संस्थांना पारितोषिके आणि बक्षिसांचे वितरण केले त्याशिवाय पोलीस प्रशिक्षणात अव्वल ठरलेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींनाही पदके बहाल केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी पोलीस संशोधन आणि विकास विभागांच्या प्रकाशनाचे अनावरण केले, तसेच हिंदी भाषेतील साहित्यासाठी असलेल्या पंडित गोविंद वल्लभ पंत पारितोषिकांचे वितरण केले.

टोक्यो ऑलिंपिक 2020 मधील रौप्य पदक विजेती एस मीराबाई चानू हिचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

आपली समर्पकता 51 वर्षे टिकवून ठेवण्यासाठी कुठल्याही संस्थेला अपरिमित प्रयत्न करावे लागतात आणि पोलीस संशोधन आणि विकास विभागाने ते यशस्वीरित्या साध्य केले आहे्. एवढेच नाही तर स्वतःचे सामर्थ्य सिद्ध केले आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पोलीस संशोधन आणि विकास विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण काम करत आहे, असे सांगत अमित शहा यांनी आपल्या आधीच्या भेटीत "पोलीस संशोधन आणि विकास विभागशिवाय चांगल्या पोलीस दलाची कल्पनाही करू शकत नाही", असा शेरा दिल्याचे नमूद केले. पोलीस संशोधन आणि विकास विभागाने (BPR&D) सुधारणा, प्रशिक्षण आणि सर्व दलातील तसेच पोलीस संस्थांमधील कमतरतांवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे ते म्हणाले.

कोविड-19 महामारीच्या कालखंडात देशाच्या पंतप्रधानांपासून देशातील बालकांपर्यंत प्रत्येकाने पोलीस दलाच्या सेवांचे कौतुक केले होते. पोलीस दलावर पंतप्रधानांनी पुष्पवृष्टी केली होती आणि त्या दिवशी पहिल्यांदाच पोलीस दलाला त्यांच्या कष्टांची दखल घेतली गेल्याचे व आदर मिळाल्याचे समाधान मिळाले., असे शाह म्हणाले. महामारीच्या काळात देशभरातील पोलीस दलाने अत्यंत चांगले काम पार पाडले आणि त्याची नोंद झाली पाहिजे असेही शाह यांनी नमूद केले.

गेल्या 75 वर्षात 35,000 पोलिस कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कर्तव्ये बजावताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत  पोलीस स्मारक उभारले, जेणेकरून पोलीस या देशाच्या सेवेसाठी सदैव व अभिमानाने उभा आहे हे अधोरेखित झाले,असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

टोक्यो ऑलिंपिक 2020 पदक विजेती एस मीराबाई चानूचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी अभिनंदन केले आणि तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या. पुढील वेळेस ती सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पोलीस संशोधन आणि विकास विभागाचे (BRP&D) चे मुख्य कार्य म्हणजे जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम कार्यपद्धतीच्या अभ्यासाने आपल्या पोलीस दलाला कार्यक्षम करून आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवणे हे आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गृहमंत्रालय भारतीय दंड संहिता ,भारतीय गुन्हे संहिता आणि पुरावा कायदा यांच्यामध्ये मूलभूत बदल करण्यासाठी काम करत आहे. या कामात पोलीस संशोधन आणि विकास विभागाने त्यांचा योग्य पद्धतीने सहकार्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.

पोलीस संशोधन आणि विकास विभागाने सुधारणा प्रत्यक्षात राबवल्या जाव्यात यासाठीही कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले. आपल्या प्रवासाची शंभर वर्षे पूर्ण करताना ही संस्था आपली समर्पकता सिद्ध करेल आणि महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पुढील प्रवास सुरू ठेवेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1752170) Visitor Counter : 937