महिला आणि बालविकास मंत्रालय

समाजातील घटकांमध्ये “पोषण अभियान” बाबत  जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे सोमवारी मुंबईत आयोजन


केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी आणि मुख्तार अब्बास नक्वी मुंबईत पोषण जागरूकता कार्यक्रमांना उपस्थित राहणार

अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना पोषण किट मिळणार

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री  धारावी येथील एकात्मिक बालविकास केंद्राला भेट देऊन आयसीडीएस लाभार्थी आणि स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधणार

Posted On: 04 SEP 2021 4:54PM by PIB Mumbai

 

सोमवार, 6  सप्टेंबर,  2021 रोजी मुंबईत विविध ठिकाणी, समाजातील विविध घटकांमध्ये, पोषण माह अंतर्गत पोषण जागरुकता अभियान (पोषण जागृती अभियान) कार्यक्रमांची एक मालिका आयोजित केली जात आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन  इराणी आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री  मुख्तार अब्बास नक्वी या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.  केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय संयुक्तपणे हे कार्यक्रम आयोजित करत आहेत.

पोषण जागरूकता कार्यक्रम अंजुमन-इ -इस्लाम गर्ल्स स्कूल, एस व्ही रोड, बाजार रोड, वांद्रे पश्चिम  ; महात्मा गांधी सेवा मंदिर हॉल, एस व्ही रोड, वांद्रे पश्चिम; अवर  लेडी ऑफ गुड कौन्सेल हायस्कूल, शीव  रेल्वे स्थानक  जवळ; आणि पार्झर फाउंडेशनची द दादर अथॉर्नन इन्स्टिट्यूट, फिरदौसी रोड, मंचेरजी जोशी पारसी कॉलनी, दादर, मुंबई येथे 6 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहेत.

ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, पारशी, जैन आणि शीख या अल्पसंख्य समाजातील तसेच गरीब आणि मागास भागातील महिला त्यांच्या कुटुंबीयांसह मुंबईतील पोषण अभियान कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यांना पोषणाच्या फायद्यांविषयी माहिती दिली जाईल आणि  पोषण किटचे वाटपही केले जाणार आहे.

पोषण अभियान कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापूर्वी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री सोमवारी प्रथम  धारावी येथील एकात्मिक बाल विकास सेवा केंद्राला भेट देतील आणि आयसीडीएस लाभार्थी आणि स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करतील. तसेच या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या नागरिकांच्या घरीही त्या जाणार आहेत.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री म्हणाल्या की, केंद्र सरकारने कुपोषणाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मार्च 2018 मध्ये पोषण अभियान सुरू केले. तेव्हापासून, समाजात वर्तणुकीतील बदलासाठी विशेष समर्पित उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने‘  सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जातो. पोषण माह 2019 मध्ये देशभरात 3.66 कोटी उपक्रम राबवण्यात आले, तर 2020 मध्ये अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण  मोहीम आणि  पोषण बाग विकसित करण्याची  सुरुवात झाली.  पोषण माह 2020 मध्ये 12.84 लाख वृक्षारोपण मोहीमांचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या 75  व्या वर्षानिमित्त देश "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" साजरा करत असताना "पोषण अभियानाला " खूप महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुली आणि महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी वचनबद्धतेने काम केले आहे. पोषण अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, मिशन इंद्रधनुष, स्वच्छ भारत मिशन आणि उज्ज्वला योजना यासारख्या योजना त्याची उदाहरणे आहेत.

खासदार पूनम महाजनगोपाल शेट्टीमनोज कोटक आणि  राहुल शेवाळे; महाराष्ट्र सरकारमधील महिला व बालविकास मंत्री  यशोमती चंद्रकांत ठाकूर; आमदार  एम. पी. लोढा आणि आशिष शेलार; केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव इंदेवार पांडे; केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव  रेणुका कुमार; एनसीएम सचिव आणि एनएमडीएफसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचलक एस के देव वर्मन; केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहसचिव पल्लवी अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच अंजुमन-इ-इस्लामचे अध्यक्ष, डॉ.जहीर काझी; बॉम्बे पारसी पंचायत अध्यक्ष  अरमायती तिरंदाज आणि सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील इतर मान्यवर मुंबईत विविध ठिकाणी पोषण अभियान जनजागृती मोहिमेला उपस्थित राहतील.

 

पोषण अभियानाबाबत

पोषण (समग्र पोषणसाठी पंतप्रधानांची व्यापक योजना) अभियान हा लहान मुले, पौगंडावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण सुधारण्याचा केंद्र  सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. 8  मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले हे अभियान मिशन-मोडमध्ये कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते.

आरोग्य, निरोगीपणा आणि रोग तसेच कुपोषणाबाबत  प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पद्धती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करून पोषण सामग्री, वितरण, संपर्क  आणि परिणाम मजबूत  करण्यासाठी एकात्मिक पोषण समर्थन कार्यक्रम म्हणून 2021-2022 च्या अर्थसंकल्पात मिशन पोषण 2.0 (सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0) ची घोषणा करण्यात आली आहे.

 

पोषण माह 2021

या वर्षी, भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना  वेगवान आणि व्यापक  पोहोच सुनिश्चित करण्यासाठी, पोषण माह 2021 संकल्पना आधारित  पद्धतीने साजरा केला जात आहे. सर्वांगीण पोषण सुधारण्याच्या दिशेने केंद्रित आणि सामावून घेण्याच्या दृष्टीने संपूर्ण सप्टेंबर 2021 महिन्याची  साप्ताहिक संकल्पनांमध्ये विभागणी केली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने महिनाभर अनेक उपक्रमांचे नियोजन केले आहे. याचे तपशील येथे मिळू  शकतात.

 

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना

एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएस ) योजना ही केंद्र  सरकारच्या महत्वाकांक्षी  कार्यक्रमांपैकी एक आहे आणि बालपणातील काळजी  आणि विकासाबाबत जगातील सर्वात मोठ्या आणि विशिष्ट  कार्यक्रमांपैकी एक आहे. एका बाजूला बालवाडीचे  अनौपचारिक शिक्षण आणि दुसरीकडे कुपोषण, शिकण्याची क्षमता कमी होणे आणि मृत्युदर यांचे दुष्ट चक्र मोडण्याच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपल्या मुलांसाठी आणि स्तनदा मातांप्रती  देशाच्या वचनबद्धतेचे हे प्रमुख प्रतीक आहे. या  योजनेअंतर्गत लाभार्थीमध्ये  0-6 वयोगटातील मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा समावेश आहे.

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752008) Visitor Counter : 396