महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतील न्युट्री गार्डन अर्थात पोषणबागेचे उद्घाटन केले


देशाची पोषणविषयक गरज भागविण्याची क्षमता आयुर्वेदात आहे : स्मृती झुबीन ईराणी

Posted On: 01 SEP 2021 5:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2021

 

पोषण मास 2021 अंतर्गत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांच्या मालिकेचे उद्घाटन करताना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन ईराणी आज म्हणाल्या की देशाच्या पोषणविषयक गरजा भागविण्यासाठी आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाचा वापर कशा प्रकारे परिणामकारकतेने वापरता येऊ शकेल याची माहिती मिळविणे ही आजच्या काळाची गरज आहे.

पोषण मास – 2021 ची सुरुवात करताना आज केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतील न्युट्री गार्डन अर्थात पोषण बागेचे उद्घाटन केले. केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ.महेंद्रभाई मुंजपरा हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.दोन्ही उपस्थित मंत्र्यांनी शेवगा आणि आवळ्याच्या रोपांची लागवड केली. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने पोषण मास-2021 उत्सव उपक्रमाची सुरुवात केली.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री ईराणी यांनी त्यांच्या भाषणात सर्वसामान्यांतील रक्ताल्पता या लक्षणाचा प्रभाव कमी करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळासोबत सहकार्याने हाती घेतलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. यातील आयुर्वेदाच्या योगदानाची पोचपावती साऱ्या जगाला मिळावी म्हणून याबद्दलची शास्त्रीय आकडेवारी जाहीर व्हायला हवी या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. संपूर्ण स्वास्थ्य मिळविण्यासाठी पोषणाचे दोन मुख्य घटक आहेत, ते म्हणजे परवडण्याजोग्या किमतीत मिळणारे आणि सर्वत्र सुलभतेने उपलब्ध असणारे. आणि यासाठी आयुर्वेद अत्यंत लाभदायक ठरू शकतो असे त्या म्हणाल्या.

डॉ.महेंद्रभाई मुंजपरा यांनी शेवगा , शतावरी, अश्वगंधा, आवळा, तुळसी, हळद यासारख्या आयुर्वेदिक वनौषधींच्या पोषणविषयक आणि औषधी गुणधर्मांचे महत्त्व अधोरेखित केले तसेच त्यांनी आई आणि तिचे बाळ यांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी अनुभवांवर आधारित आयुर्वेदिक पोषण पद्धतींना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व देखील समजावून सांगितले.  

पोषण मास-2021  या एक महिना कालावधीच्या उत्सवी उपक्रमात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने पोषण या संकल्पनेवर आधारित रुग्ण जागृतीविषयक व्याख्याने, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, तज्ञांची व्याख्याने आणि चर्चासत्रे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

विविध राज्यांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या सत्तूचे पेय, तिळाचे लाडू, वरीची खीर,अळीवाचे  लाडू, इत्यादींसारख्या उत्तमरीत्या पोषक आयुर्वेदिक पाककृतींची माहिती देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रदर्शित करण्यात आली होती.


* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1751112) Visitor Counter : 291