उपराष्ट्रपती कार्यालय
भारताचा दृष्टिकोन कधीही विस्तारवादी नव्हता - उपराष्ट्रपती
आमचा दृष्टिकोन शांततापूर्ण सहअस्तित्वाचा आहे आणि दहशत आणि संकटे निर्माण करणाऱ्या शक्तींना रोखण्याचा आहे- उपराष्ट्रपती
भारताला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी उपराष्ट्रपतींनी वैज्ञानिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन केले
शिक्षण आणि उद्योग यांच्यात समन्वय निर्माण करून ‘एरोस्पेस हब’ विकसित करण्याचे केले आवाहन
फलदायी परिणामांसाठी संरक्षण प्रकल्पांमध्ये खाजगी भागीदारांना सहभागी करून घ्या - उपराष्ट्रपती
83 तेजस लढाऊ विमानांची भारतीय हवाई दलाकडून मागणी ही भारतातील एरोस्पेस क्षेत्रासाठी मोठी चालना - उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतींनी बबंगळुरू येथील एचएएलच्या विमान निर्मिती सुविधांना भेट दिली
एचएएलचा विकास म्हणजेच भारतीय विमान उद्योगाचा विकास - उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतीनी सर्वसमावेशक, प्रादेशिकदृष्ट्या संतुलित आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत विकास कार्यक्रमाचे केले आवाहन
Posted On:
20 AUG 2021 4:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2021
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी भारताला संरक्षण तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि आधुनिक लष्करी हार्डवेअरचे निर्यात केंद्र म्हणून उदयाला येण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला.
बंगळुरूच्या एचएएल संकुलात हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, येत्या काही वर्षांत स्वदेशी उत्पादने भारताला अवकाश सामग्री उद्योग आणि संरक्षण क्षेत्राची महासत्ता म्हणून विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, उपग्रह आणि अंतराळयाने तयार करण्याची भारताची क्षमता लक्षात घेऊन ते म्हणाले, "विरोधाभास अजूनही आहेच की आपण अजूनही जगातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्रे आयातदारांपैकी एक आहोत". त्यांनी महत्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासाची गती वेगाने वाढवून ही परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले.
अत्यंत जटील भू -राजकीय वातावरणामुळे देशाला भेडसावणाऱ्या अनेक सुरक्षा आव्हानांकडे लक्ष वेधून, उपराष्ट्रपतींनी सुरक्षा दलांच्या अनुकरणीय धाडस आणि व्यावसायिकतेबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, "आपले सशस्त्र दल कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आणि कोणत्याही सुरक्षेच्या धोक्याला ठामपणे परतवून लावण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची खात्री करून घेणे हे आपले कर्तव्य आहे."
उपराष्ट्रपती म्हणाले की, भारताला आपल्या सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत , मात्र काही देश भारताविरुद्ध दहशतवादाला पाठबळ देत आहेत आणि निधीचा पुरवठा करत आहेत तर काही देश विस्तारवादी प्रवृत्तीचे दर्शन घडवत आहेत. ते म्हणाले, "म्हणूनच देशाच्या शांती आणि समृद्धीसाठी आपल्या सीमांचे संरक्षण आणि सुरक्षा खूप महत्वाची आहे." भारताचा दृष्टिकोन कधीच विस्तारवादी नव्हता यावर भर देताना नायडू म्हणाले की, आमचा दृष्टिकोन शांततापूर्ण सहअस्तित्वाचा आहे आणि दहशत आणि संकटे निर्माण करणाऱ्या शक्तींना रोखण्याचा आहे. ते म्हणाले, “भारताला आपल्या लोकांच्या प्रगती आणि विकासासाठी मजबूत व्हायचे आहे.
संरक्षण सामुग्री निर्मितीमध्ये स्वदेशीकरण आणि स्वयंपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आखलेल्या अनेक धोरणात्मक उपक्रमांचा उल्लेख करताना नायडूंनी फलदायी परिणामांसाठी संरक्षण प्रकल्पांमध्ये खाजगी भागीदारांना सहभागी करून घेण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, " जगभरातील सर्वोत्तम उत्पादनांशी तुलना करता येईल अशी स्पर्धात्मक उत्पादने आपण तयार करतो हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला धोरणात्मक भागीदारी, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि संघभावनेने काम करण्याच्या वृत्तीवरर अवलंबून राहावे लागणार आहे ."
संरक्षण क्षेत्रासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवणे, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन संरक्षण कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय आणि संरक्षण मंत्रालयाकडून दोन सकारात्मक स्वदेशीकरण याद्यांची अधिसूचना यासारख्या उपाययोजनांमुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला अनेक संधी आहेत.
83 तेजस लढाऊ जेट साठी नुकत्याच झालेल्या करारात हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड समवेत भारतीय कंपन्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल प्रशंसा करत अशा प्रकल्पामध्ये भारतीय अंतराळ सामग्री निर्मिती परिसंस्था, आत्मनिर्भर करण्याची क्षमता असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.
अंतराळ उद्योग क्षेत्रातल्या नवोन्मेष प्रक्रियेसाठी मोठी जोखीम आणि खर्चिक गुंतवणूकीची आवश्यकता असते असे सांगून उद्योग जगत आणि संशोधक यांच्या सक्रीय सहयोगाने या प्रक्रियेला वेग देता येऊ शकतो असे त्यांनी सांगितले. अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासात प्रतिभाशाली लोकांना आकर्षित करण्याच्या आवश्यकतेवर भर देत एरोस्पेस हब विकसित करण्यासाठी शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यामध्ये सांगड घालण्याचे आवाहन त्यांनी केले. यामुळे नवोन्मेषाला चालना मिळून या महत्वाच्या क्षेत्रातल्या कौशल्य कमतरता दूर होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
याआधी उपराष्ट्रपतींनी हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेडच्या एलसीए तेजस उत्पादन विभागाला भेट देऊन आधुनिक लढाऊ विमान निर्मितीसाठी वैज्ञानिक आणि अभियंत्यांची प्रशंसा केली.
स्वदेशात विकसित प्रगत हलक्या वजनाचे ध्रुव हेलीकॉप्टर, चिता/ चेतक हेलीकॉप्टरची जागा घेणारे हलक्या वजनाचे हेलीकॉप्टर याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा यांच्या राष्ट्रीय संरक्षण क्षेत्रातल्या योगदाना बद्दल त्यांनी प्रशंसा केली आणि एलसीए, एमके 2, मध्यम लढाऊ विमान आणि दुहेरी इंजिन डेक बेस लढाऊ विमान आराखडा याद्वारे देशाला यापुढे लढाऊ विमानांच्या गरजेसाठी परदेशावर अवलंबून राहावे लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘समर्थ आणि सक्षम भारत घडवण्यासाठी’ संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. हिंदुस्तान एरोनॉटिक्सला भेट दिल्यानंतर भारतीय संशोधकांच्या क्षमतांबद्दल आपल्याला अभिमानाची भावना दाटून आल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनाचे डीजीटायझेशन याकडे लक्ष वेधत यामुळे अंतराळ सामग्री क्षेत्रात मोठे बदल घडणार आहेत असे सांगून हिंदुस्तान एरोनॉटीक्सने उद्योग 4.0 साठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. हवाई क्षेत्रात जागतिक स्तरावर सामोरे येण्यासाठी ग्राहक समाधानाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
मानव जातीसमोरच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी नवोन्मेषाचे सामर्थ्य जाणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपला आर्थिक विकास कार्यक्रम सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या अधिक समावेशक, प्रादेशिक संतुलन साधणारा आणि पर्यावरण दृष्ट्या शाश्वत असण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
S.Patil/S.Kane/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747612)
Visitor Counter : 237