संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरडीओ मध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा

Posted On: 15 AUG 2021 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2021

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांच्या पथकाने  सीमावर्ती भागातील गावांमध्ये  स्वातंत्र्याच्या  75 वर्षांच्या स्मृतीप्रित्यर्थ  ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला. 13 ऑगस्ट 2021 रोजी संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह यांनी रवाना केलेल्या विविध डीआरडीओ प्रयोगशाळांतील पथकांनी या महत्त्वपूर्ण प्रसंगी विविध कार्यक्रमांचे  आयोजन केले.

डीडीआरओचे सामरिक दृष्ट्या महत्त्वाचे संशोधन केंद्र असलेल्या लडाखमधील चान्गला  (17664 फूट उंचीवर) येथील जगातील सर्वात उंचीवरील संशोधन आणि विकास प्रयोगशाळेत  डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय-अल्टिट्यूड रिसर्च (डीआयएचएआर) च्या शास्त्रज्ञांनी राष्ट्रध्वज फडकवला. डीआयएचएआर - डीआरडीओने कृषी-जनावरांच्या विकासामध्ये सुधारणा करण्यासाठी थांग गावातील स्थानिक लोकांसोबत संवाद बैठक आयोजित केली होती.  लडाखच्या सियाचीन क्षेत्रातील  थांग हे शेवटचे भारतीय गाव आहे. डीआयएचएआरच्या पथकाने  चीनच्या सीमेला लागून असलेल्या चांगथांग खोऱ्यातील भटक्या समुदायाशी संवाद साधला आणि 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.

डीआयएचएआरने लेह-लडाख (17,480 फूट) मधील टांगला-ला खिंड मोहिमेचे आयोजन केले.  लेहला हिमाचल प्रदेशाशी जोडणारी ही  एक प्रमुख खिंड आहे. या कार्यक्रमाला नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी आणि डीआरडीओचे माजी अधिकारी उपस्थित होते. डीआयएचएआरने चीनच्या सीमेला लागून असलेल्या लडाखच्या चांगथांग खोऱ्यात क्योन-त्सोलेक  (16,437 फूट) पर्यंत एक मोहीम आयोजित केली होती. मोहीमेच्या सदस्यांनी या भागात तैनात सशस्त्र दलांशी  संवाद साधला. डीआयएचएआरचे संचालक डॉ ओ पी चौरसिया यांनी लेह येथील डीआयएचएआर संकुलात राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधित केले.

हल्दवानी येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बायो-एनर्जी रिसर्च (DIBER) ने प्रयोगशाळेचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना तसेच लष्कराच्या जवानांना दाखवून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पिथौरागढ आणि औली येथील आपल्या फिल्ड स्टेशनवर विविध उपक्रम आयोजित करून 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला. प्रयोगशाळेने उत्तराखंडच्या सीमेवरील विविध प्रकल्प स्थळे आणि अन्य ठिकाणी आपली पथके पाठवली.

डिफेन्स जिओनफॉर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (डीजीआरई), चंदीगडने 75 वा स्वातंत्र्य दिन माउंटन मेट सेंटर श्रीनगर आणि औली आणि लाचुंग आणि मनाली येथील संशोधन आणि विकास केंद्रांवर  साजरा केला. डीजीआरईचे शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी स्थानिक लोक आणि शाळकरी मुलांशी संवाद साधला. डीजीआरईच्या अधिकाऱ्यांनी त्यांना डीआरडीओच्या उपक्रमांची आणि प्रयोगशाळेच्या कामगिरीची माहिती दिली.

देशाला 'आत्मनिर्भर' बनवण्यासाठी लोकांना डीआरडीओद्वारे अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान वापराबाबत अवगत केले जात असल्याबद्दल मान्यवरांनी डीजीआरईच्या प्रयत्नांचे कौतुक केले.  यावेळी  मुलांनी MMC सासोमा (सियाचिन) आणि MMC श्रीनगर येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले.

डीजीआरई आरडीसी मनालीने रोहतांग खिंडीत राष्ट्रध्वज फडकवला. शासकीय उच्च  माध्यमिक विद्यालय बहांग, तहसील नग्गर, कुल्लू जिल्हा येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात शिक्षक, विद्यार्थी आणि पंचायतीचे अधिकारी तसेच स्थानिक जनतेने भाग घेतला होता. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने डीजीआरईने सशस्त्र दल  आणि नागरिकांसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या आणखी एका चमूने वशिष्ठ गावाला भेट दिली, जिथे गावातील स्थानिक लोकांना ध्वजारोहणासाठी बोलावण्यात आले होते. या चमूने लोकांना डीआरडीओच्या कामगिरीची माहिती दिली आणि हिमस्खलनाच्या जागरूकतेसाठी दृकसाधने (व्हिज्युअल एड्स ) वितरित  करण्यात आली.

संरक्षण संशोधन प्रयोगशाळा (डीआरएल) तेजपूरने अरुणाचल आणि आसामच्या सीमा आणि ग्रामीण भागात ध्वजारोहण समारंभ आयोजित केला आणि सैनिक आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. तवांग येथे झालेल्या कार्यक्रमात डीआरडीओने सीमावर्ती गावात (चांगबु) भाजीपाला बियाणे किट आणि महिलांसाठी स्वच्छता किट  वितरित केली.  आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील उडमारी गावातही अशाच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आर्मी युनिट, 11PARA (SF), मिसामारी यांच्या सहकार्याने जलशुद्धीकरणाबाबत जागरूकता आणि डीआरएल, जलशुद्धीकरण प्रणालीच्या प्रात्यक्षिकांबाबत कार्यशाळा आणि संवाद आयोजित करण्यात आले. आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात  संरक्षित लागवड आणि कृषी तंत्रज्ञानावर कार्यशाळा आणि संवाद देखील आयोजित करण्यात आला होता.

सलारी येथे डीआरएल संशोधन केंद्रातही  ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सलारी गावातील स्थानिक लोकांना फळझाडांची रोपटी वितरित  करण्यात आली.  उत्सवाचा भाग म्हणून डीआरएल, तेजपूर येथे वृक्षारोपण आणि बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1746131) Visitor Counter : 303


Read this release in: English , Urdu , Hindi