वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त पीयूष गोयल यांनी व्यापारी वर्गाला केले संबोधित
प्रत्येक व्यापारी हा देशाच्या विकासातील भागीदार : पीयूष गोयल
Posted On:
09 AUG 2021 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2021
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदानाबद्दल व्यापाऱ्यांचे कौतुक केले. व्यापारी हा देशाची अर्थव्यवस्था आणि आर्थिक सत्ता यांचा कणा आहे असे उद्गार त्यांनी काढले. आजच्या राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त व्यापारी समूहाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते म्हणाले व्यापारी म्हणजे ब्रँड इंडियाचे खरेखुरे मानचिन्ह आहेत. ‘व्होकल फॉर लोकल’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला चालना देऊन ब्रँड इंडियाचे दूत बनण्याचा सल्ला त्यांनी व्यापारी वर्गाला दिला.
भारत हा वस्तू आणि सेवांसाठीचा वैश्विक मंच म्हणून आकाराला येत आहे, असे सांगून गोयल यांनी व्यापाऱ्यांना वाणिज्य आणि व्यापार याबाबतीत सर्व आघाड्यांवर आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला. व्यापार म्हणजे फक्त मालाची देवाणघेवाण नसून संस्कृती, सद्भावना आणि विश्वास यांची देवाणघेवाण आहे यावर त्यांनी भर दिला. दर्जा आणि उत्पादन ही व्यापाराची गुरुकिल्ली असल्याचे ते म्हणाले. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दर्जात्मक उत्पादनाची विक्री करण्यावरही त्यांनी भर दिला.
सरकारकडून व्यापारीवर्गाला पुर्ण सहयोग आहे याची खात्री देऊन त्यांनी कायद्यांची पायमल्ली झाल्यास ते सरकारच्या निदर्शनाला आणून देण्याची सूचना व्यापाऱ्यांना केली. व्यापारी आणि छोट्या नवउद्योजकांचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. कायद्यांचे जंजाळ कमी करून व्यापाऱ्यांची सतावणूक टाळण्याच्या हेतूने एक खिडकी योजना आणण्यावर सरकार काम करत आहे असे त्यांनी नमूद केले. स्व-रोजगार, स्वदेशी आणि सुगम व्यापार याला चालना देण्याची विनंती गोयल यांनी व्यापाऱ्यांना केली.
कोविड महामारीत व्यापाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी प्रशंसा केली. कोविड महामारीच्या गेल्या 15-16 महिन्यांत व्यापाऱ्यांनी विशेषतः दूरगामी भागांमध्ये राहणाऱ्यांनी प्रत्येक कानाकोपऱ्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखला आणि लोकांच्या गरजा भागवल्या. आजही आपल्या दिनक्रमात कोविड-19 नियमावलीचे पालन करण्याबाबत दक्ष राहण्याच्या व कोविड लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेण्याच्या सुचना त्यांनी व्यापाऱ्यांना केल्या.
* * *
M.Chopade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1744230)
Visitor Counter : 181