उपराष्ट्रपती कार्यालय

हॉकीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला गतवैभव मिळवून देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारे आणि उद्योग जगताला केले आवाहन

वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर येत आपल्या महान संस्कृती आणि परंपरांचा अभिमान बाळगण्याची ही वेळ - उपराष्ट्रपती

दिवंगत समाजसेवक श्री चमनलालजी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे केले प्रकाशन

Posted On: 07 AUG 2021 3:51PM by PIB Mumbai

 

हॉकीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन आज उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. राज्य सरकारे आणि उद्योग जगताने पुढे येत भारतीय खेळांना आवश्यक ते  प्रोत्साहन द्यावे असेही ते म्हणाले.  

दिवंगत समाजसेवक आणि राष्ट्रवादी नेते  श्री चमनलालजी यांच्या स्मरणार्थ उपराष्ट्रपती निवासात त्यांनी आज टपाल तिकीटाचे  प्रकाशन केले. टोकियो ऑलिंपिकमधील भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीने खेळांमधली रुची पुन्हा जिवंत केली आहे. हॉकी, कबड्डी यासारख्या पारंपरिक भारतीय खेळांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले. यासाठी प्राथमिक स्तरापासून, कृत्रिम हिरवळ (टर्फ), प्रशिक्षण आणि मार्गदर्शन यासह पायाभूत सुविधा अधिक सक्षम करायला हव्यात असे ते म्हणाले. केन्द्र सरकार भारतीय खेळांना देत असलेल्या प्रोत्साहनाची श्री नायडू यांनी प्रशंसा केली.

इतरांच्या वसाहतवादी मानसिकतेचे अंधानुकरण करु नये, तर आपल्या महान संस्कृती आणि परंपरांचा अभिमान बाळगावा असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. भारतीयांमधे प्रत्येक क्षेत्रात अंगभूत प्रतिभा, गुणवत्ता आहे, त्याला योग्यरित्या पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 देश आणि समाजासाठी निस्वार्थीपणे आयुष्य वेचणाऱ्या श्री चमनलालजी यांना उपराष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली. श्री चमनलालजी महान राष्ट्रवादी नेते, थोर द्रष्टे विचारवंत होते, सेवा, तत्व आणि सर्जनशीलता यातून त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान घडले होते असे श्री नायडू म्हणाले.

वैयक्तिक अधिकार आणि सामाजिक कर्तव्य याचे संतुलन राखण्याची गरज व्यक्त करत, सामाजिक जबाबदारी न घेता अधिकारांचाच अधिक आग्रह धरला तर सामाजिक अंसुतलन निर्माण होऊ शकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम्ची भावना श्री चमनलालजी यांनी जपली. शतकानुशतके परदेशात राहाणाऱ्या भारतीयांना मायभूमीशी यशस्वीपणे जोडले, भारतीयत्वाची भावना त्यांच्यात रुजवली. जगभरात पसरलेल्या भारतीयांना जोडण्याचे, त्यांचे जाळे विणण्याचे काम श्री चमनलालजी यांनी अथकपणे  केल्याचे श्री नायडू यांनी सांगितले. 

आणीबाणीच्या काळात श्री चमनलालजी यांनी वठवलेल्या महत्वपूर्ण भूमिकेची आठवण उपराष्ट्रपतींनी करुन दिली. अतिशय धोका असतानाही त्यांनी कारागृहात असलेल्यांच्या कुटुंबियांना मदत केली. वयाने ज्येष्ठ असूनही ते सतत नावीन्यपूर्ण कल्पनांनी भारलेले असायचे, नवनवीन जबाबदाऱ्या घेण्यासाठी नेहमीच तयार असायचे असे चमनलालजी यांच्याबरोबर झालेल्या वैयक्तिक संवादाची आठवण करुन देताना श्री नायडू म्हणाले. 

जागतिक पातळीवर भारतीयांच्या कामगिरीची दखल घेत त्याला उजाळा देण्याचे काम जागतिक अभ्यास केन्द्र करते. या केन्द्रामागची प्रेरणा श्री चमनलालजी यांची होते असे त्यांनी सांगितले. श्री चमनलालजी यांची जन्मशताब्दी जगभरात साजरी करत असल्याबद्दल त्यांनी जागतिक अभ्यास केन्द्राचे अभिनंदन केले. याबरोबरच, श्री चमनलालजी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्याच्या केन्द्रीय दळणवळण मंत्रालयाच्या निर्णयाचेही उपराष्ट्रपतींनी स्वागत केले.

केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव, दळणवळण राज्यमंत्री श्री देवूसिंह चौहान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री श्री राजीव चंद्रशेखर, खासदार डॉ हर्षवर्धन, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी , डॉ. विनय सहस्रबुद्धे, पोस्टाचे सचिव श्री विनीत पांडे, आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743549) Visitor Counter : 261