संरक्षण मंत्रालय
आय इ इ इ च्या रेंज तंत्रज्ञानावरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Posted On:
05 AUG 2021 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
- संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO )ने आभासी पद्धतीने केले आयोजन
- संरक्षण पद्धतींच्या चाचण्या व मूल्यांकनाविषयी व्याख्याते त्यांच्या कामगिरीचे सादरीकरण करणार
- चाचण्या व मूल्यांकनाविषयीच्या भावी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी रेंज तंत्रज्ञानाला आत्मसात करण्याचे संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)अध्यक्षांचे आवाहन
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियंता संस्थेच्या ( IEEE)च्या रेंज तंत्रज्ञानावरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (ICORT 2021) आयोजन आज 5 ऑगस्ट 2021 रोजी होत आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO ) च्या अंतर्गत चांदीपूर इथे कार्यरत इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR ) या प्रयोगशाळेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव तसेच DRDO चे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन झाले.
आपल्या भाषणात डॉ जी सतीश रेड्डी यांनी चाचण्या व मूल्यांकनाविषयीच्या भावी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी रेंज तंत्रज्ञानातील अद्ययावत सुधारणा आत्मसात करण्याचे महत्व अधोरेखित केले.या परिषदेमध्ये रेंज तंत्रज्ञान व रेंज इंस्ट्रुमेंटेशन मधील आधुनिक सुधारणांवर चर्चा होणार असून हे जागतिक स्तरावरील टेस्ट रेंज उभारण्यासाठी अत्यावश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला .
रेंज तंत्रज्ञानात रुची असणाऱ्या सर्व जणांना एकमेकांशी विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी व या क्षेत्रातील अद्ययावत सुधारणांची माहिती प्रसारित करण्यासाठी या परिषदेमुळे एक व्यासपीठ उपलब्ध होईल. यासंबंधातील तंत्रज्ञानावर 250 हुन जास्त लेख तज्ज्ञांनी सादर केले असून त्यापैकी 122 लेखाची एका विशेष तज्ज्ञ समितीने निवड केली आहे.
आज चार समांतर स्तरांमधून तंत्रज्ञानविषयक सादरीकरणे होत आहेत. त्याशिवाय एक आभासी औद्योगिक प्रदर्शन आयोजित केले असून त्यात 25 हुन जास्त भारतीय तसेच परदेशी उद्योग व संस्था त्यांची उत्पादने व तंत्रज्ञान सादर करत आहेत.
M.Iyengar/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742855)
Visitor Counter : 304