अर्थ मंत्रालय

सीबीआयसीकडून अनुपालन माहिती पोर्टल( सीआयपी)च्या सुविधेचा प्रारंभ


सीमाशुल्क विभागाच्या सर्व प्रक्रिया आणि सीमाशुल्क लागू असलेल्या सुमारे 12,000 वस्तूंसाठी नियामक अनुपालनाची माहिती या पोर्टलवर उपलब्ध

Posted On: 04 AUG 2021 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्‍ट 2021
 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने आज सीमाशुल्क विभागाच्या सर्व प्रक्रिया आणि सीमाशुल्क लागू असलेल्या सुमारे 12,000  वस्तूंसाठी नियामक अनुपालनाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  भारतीय सीमाशुल्क अनुपालन माहिती पोर्टल (सीआयपी) सुरू केले आहे. व्यवसायाचे सक्षमीकरण करण्यासाठी त्याचबरोबर आयात निर्यात करण्यासाठी सीमाशुल्क विभाग आणि भागीदार सरकारी संस्था (FSSAI, AQIS, PQIS, Drug Controller) यांच्या कायदेशीर आणि प्रक्रियाविषयक गरजांच्या माहितीमध्ये रुची असलेल्या कोणत्याही व्यक्तीला  अद्ययावत माहिती देणारे सीआयपी पोर्टल ही आणखी एक सुविधा आहे. केवळ एक बटण क्लिक करून सीमाशुल्क लागू असलेल्या सर्व वस्तूंच्या आयात निर्यातीशी संबंधित गरजांची संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्याने सीमेपलीकडील व्यापार करणे आणखी जास्त सुलभ होणार आहे.

या पोर्टलचा वापर करण्यासाठी वापर करणाऱ्याने सीटीएच म्हणजेच सीमाशुल्क शीर्षक एन्टर केले पाहिजे किंवा संबंधित वस्तूचे वर्णन याची माहिती टाईप केली पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तीला आयात आणि निर्यात या दोन्हींसाठी प्रत्येक टप्प्यानुसार प्रक्रिया, परवाना, प्रमाणपत्र इत्यादी अनुपालन गरजांची माहिती उपलब्ध होईल. यामध्ये टपाल आणि कुरियर यांच्याद्वारे होणारी आयात निर्यात, नमुन्यांची आयात, मालाची पुनर्आयात आणि पुनर्निर्यात आणि निर्यातदार आणि प्रकल्पांसाठी होणारी आयात यासाठी स्वतः सील करण्याची सुविधा यांचा समावेश आहे.

या सुविधेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संपूर्ण भारतातील सीमाशुल्क विभागाची बंदरे, विमानतळ, भूमी सीमाशुल्क स्थानके इत्यादींचा नकाशा पाहता येईल. यामध्ये नियामक संस्थांचे पत्ते आणि त्यांची संकेतस्थळे यांचा देखील समावेश आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742432) Visitor Counter : 274