अंतराळ विभाग

भारतीय अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान संस्था आणि नेदरलँड्सच्या डेल्फ्ट तंत्रज्ञान विद्यापीठ (TU Delft) यांच्यामध्ये संशोधन सहकार्यासंबधी सामंजस्य कराराला मंत्रीमंडळाची मंजूरी

Posted On: 04 AUG 2021 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्‍ट 2021
 

भारतीय अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान संस्था आणि  डेल्फ्ट तंत्रज्ञान विद्यापीठ या दोन्ही संस्थांमधील विद्यार्थी तसेच विभागीय कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम व संशोधनात्मक कार्यक्रम राबवण्यासंदर्भात दोन्ही शैक्षणिक संस्थांमधील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्य़क्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. या करारावर 09 एप्रिल 2021 आणि 17 मे 2021 ला संबधित विद्यापिठांकडून स्वाक्षऱ्या झाल्या व ते इमेलच्या माध्यमातून परस्परांना पाठवण्यात आले.

सामंजस्य कराराचा तपशील :

  1. विद्यार्थी अदलाबदल कार्यक्रम :- दोन्ही संस्था पदवी, पदव्युत्तर वा डॉक्टरल स्तरावरील विद्यांर्थ्याची अदलाबदल करु शकतील. अभ्यासाची क्षेत्रे, या योजनेतून सहभागींना मिळणारी क्रेडिट्स याबद्दल दोन्ही संस्था विचारविनिमय करून परस्पर सहकार्यांने निर्णय घेतील.
  2. दुहेरी पदवी कार्यक्रम : पदवीवर्गातील किंवा पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ संस्थेतून मिळालेल्या पदवीशिवाय दुसऱ्या विद्यापीठातील पदवी वा पदव्युत्तर पदवी मिळवता यावी या उद्देशाने विशेष अभ्यासक्रम विकसित करण्यात येतील.
  3. इंटर्नशीप व प्रकल्पकार्य :  सहभागी शिक्षणसंस्थेतील छोट्या वा मोठ्या वास्तव्यात विद्यार्थ्यांना पार पाडता येतील असे अभियांत्रिकी प्रकल्प दोन्ही शिक्षणसंस्थांना तयार व विकसित करता येतील.
  4. कर्मचारी अदलाबदल : दोन्ही संस्थांना सहभागी संस्थांमधील कर्मचारी-अदलाबदल कार्यक्रम हाती घेउन उभय संस्थांच्या विचाराने संयुक्त अभ्यासक्रम ठरवता येईल.
  5. संयुक्त संशोधन : दोन्ही संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सामायिक पसंतीच्या संयुक्त संशोधन प्रकल्पात ठराविक कालावधीसाठी एकत्र काम करता येईल.

 

लाभ:

या करारान्वये कर्मचारी अदलाबदल, विद्यार्था शिक्षक व संशोधक अदलाबदल, विज्ञानसंबधीत साहित्य, प्रकाशने वा माहिती यांच्या देवाणघेवाणीतून महत्वपूर्ण सामायिक क्षेत्रातील संभाव्य सहकार्य

EWI, डेल्फ्ट तंत्रज्ञान विद्यापीठ या नेदरलँड्समधील सर्वात जुन्या व मोठ्या डच सार्वजनिक तंत्रज्ञान विद्यापीठाशी या करारातून साधलेल्या सहकार्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये संशोधनात्मक संयुक्त कार्यक्रम विकसित करण्याच्या दृष्टीने वाटचाल होईल. 


* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742423) Visitor Counter : 178