राष्ट्रपती कार्यालय

काश्मीरमधील युवा पिढीने त्यांच्या समृद्ध परंपरेपासून शिकवण घ्यावी असे राष्ट्रपती कोविंद यांचे आवाहन


काश्मीर विद्यापीठाच्या 19 व्या दीक्षांत समारंभाला भारताच्या राष्ट्रपतींची उपस्थिती


Posted On: 27 JUL 2021 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2021

काश्मीरमधील युवा पिढीने काश्मीरच्या समृद्ध परंपरेपासून शिकवण घ्यावी अशी आग्रही विनंती भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली आहे. काश्मीर हा उर्वरित भारतासाठी नेहमीच आशेचा किरण म्हणून काम करत आहे हे काश्मीरमधील युवक वर्गाने जाणून घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. काश्मीरच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रभावाने संपूर्ण भारतात आपली छाप सोडली आहे असे त्यांनी सांगितले. काश्मीर विद्यापीठाच्या, श्रीनगर येथे आज (27 जुलै 2021) झालेल्या 19 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते उपस्थितांना संबोधित करत होते.

राष्ट्रपती म्हणाले की काश्मीर हे वर्णनाला महत्त्व देणारे स्थळ आहे. अनेक कवींनी काश्मीरला पुथ्वीवरील स्वर्गाची उपमा देऊन या स्थळाचे सौंदर्य शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र खरेतर हे सोंदर्य शब्दातीत आहे.बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले हे खोरे दोन हजार वर्षांपूर्वीच साधू संतांना आणि सिद्धपुरुषांना त्यांच्या तपश्चर्येसाठी आदर्श जागा वाटली होती. काश्मीरच्या योगदानाचा संदर्भ  घेतल्याशिवाय भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास लिहिणे शक्य नाही. अत्यंत प्राचीन साहित्यापैकी एक असलेल्या ऋग्वेदाचे लिखाण काश्मीरमध्येच करण्यात आले. काश्मीरमध्ये हिंदु आणि बौद्ध परंपरांची भरभराट तर झालीच पण त्याचसोबत नंतरच्या शतकांमध्ये काश्मीरमध्ये आलेल्या इस्लाम आणि शीख परंपरा देखील येथे समृध्द झाल्या.

काश्मीर हे अनेक संस्कृती एकत्र येण्याचे स्थळ देखील आहे. कवयित्री लल्लेश्वरी हिच्या लिखाणात सामाजिक एकोपा आणि शांततापूर्ण सहअस्तित्व राखण्याचा आदर्श  काश्मीरने कशा प्रकारे घालून दिला आहे याचा नमुना आपल्याला  पाहायला मिळू शकतो. काश्मीरमधील लोककला आणि उत्सव, इथले अन्न आणि वस्त्रे यांच्यासह   येथील समाज जीवनाच्या सगळ्या पैलूंमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून येते. या जागेचा मूळ स्वभाव नेहमीच समावेशी राहिला आहे. रूढीवाद टाळून समुदायांमध्ये सहिष्णुता आणि परस्परांचा स्वीकार करण्याची परंपरा जपणारा इथला ‘काश्मिरियत’चा अद्वितीय गुणधर्म या भूमीवर आलेल्या जवळजवळ सर्वच धर्मांनी आपलासा केला.

राष्ट्रपती म्हणाले की, शांततापूर्ण सहअस्तित्व राखण्याची ही सर्वोत्तम परंपरा खंडित झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे. ‘काश्मिरियत’ मध्ये कधीही अंतर्भूत नसलेली हिंसा इथल्या दैनंदिन जीवनातील सत्य झाली होती. मात्र आता, या भूमीची हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळविण्यासाठी दृढनिश्चयी प्रयत्नांतून येथे एक नवी सुरुवात होत आहे.  

लोकशाहीमध्ये सर्व फरक मिटवण्याची आणि नागरिकांच्या क्षमतांमधून उत्तम असलेल्या गुणांना उभारी द्यायची  क्षमता असते यावर आपला दृढ विश्वास आहे अस सांगून राष्ट्रपती म्हणाले की काश्मीरमधील जनतेला आता या गोष्टीचा साक्षात्कार होत आहे.

काश्मीर विद्यापीठातून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी निम्म्या मुली आहेत तसेच सुवर्णपदक मिळविणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये देखील 70% मुलीच आहेत या तथ्याकडे निर्देश करून राष्ट्रपतींनी सांगितले की नव्या भारताची यशस्वी उभारणी करण्यासाठी सर्व महिलांमध्ये असणारा समता आणि क्षमतांवरील  हा विश्वास वाढविण्याची गरज आहे.

राष्ट्रपती म्हणाले की, शिक्षण आपल्या राष्ट्र उभारणीच्या पायामधील कोनशीला आहे.  शिक्षणाची खूप महान परंपरा आपल्याकडे आहे. 21व्या शतकातील आव्हाने उत्तमपणे पेलण्यासाठी मदत होईल अशा रीतीने आपल्या समृध्द वारशामध्ये आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाचे एकीकरण करण्याची गरज आहे असे ते म्हणाले आणि याच दृष्टीकोनातून, गेल्या वर्षी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा करण्यात आली असे राष्ट्रपतींनी सांगितले .

या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील काही उपक्रम काश्मीर विद्यापीठात सुरु देखील झाले आहेत याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

हवामान बदलाच्या समस्येबाबत बोलताना राष्ट्रपती म्हणाले की जागतिक उष्मावाढीचा परिणाम सर्वत्र जाणवत आहे, पण जितका त्याचा परिणाम हिमालयातील नाजूक परिसंस्थांवर झाला तितका जास्त परिणाम इतर कुठे झालेला आढळला नाही. काश्मीर विद्यापीठाने बर्फ आणि त्याचा आजूबाजूच्या परिसरावर होणारा परीणाम यांचा अभ्यास करण्यासाठी एक आणि हिमालयातील जैव-विविधतेचे दस्तऐवजीकरण, जैवसंवर्धन आणि जतन यांचा अभ्यास करण्यासाठी एक अशा दोन केंद्रांची स्थापना केल्याची नोंद घेऊन राष्ट्रपतींनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. येथे राष्ट्रीय हिमालयी बर्फ केन्द्री प्रयोगशाळा देखील आहे. ही दोन उत्कृष्टता केंद्रे आणि प्रयोगशाळा काश्मीरला अनेक प्रकारे सहाय्य करतील तसेच हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि निसर्गाची जोपासना करण्यासाठी जगाला मार्ग देखील दाखवतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739570) Visitor Counter : 299