रेल्वे मंत्रालय

राजधानी एक्स्प्रेसला तेजसचे नवे सुधारित रेक्स जोडून गाडी चालवण्यास पश्चिम रेल्वेने केली सुरुवात


खास 'तेजस' प्रकारचे स्मार्ट शयनयान पद्धतीचे डबे असणाऱ्या पहिल्या रेकचा भारतीय रेल्वेमध्ये समावेश

Posted On: 19 JUL 2021 6:51PM by PIB Mumbai

मुंबई, 19 जुलै 2021

नवीन सुधारित 'तेजस' प्रकारचे शयनयान रेक्स (रेल्वेच्या डब्यांची इंजिनविरहित शृंखला) समाविष्ट करत पश्चिम रेल्वे अतिशय आरामदायक अशा रेल्वेप्रवासाच्या प्रचीतीचे नवे पर्व सुरु करत आहे. अद्ययावत 'स्मार्ट' सुविधांनी युक्त असे हे झळझळीत सोनेरी रंगाचे डबे, पश्चिम रेल्वेच्या लब्धप्रतिष्ठित अशा मुंबई राजधानी एक्स्प्रेसला जोडले जात आहेत. या डब्यांमुळे उच्चभ्रू अशा थाटाचा प्रवास-अनुभव मिळू शकणार आहे. या दिमाखदार नव्या रेकने सोमवार दि.19 जुलै 2021 रोजी आपला पहिला प्रवास सुरु केला.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील अत्यंत मानाच्या महत्त्वपूर्ण अशा आणि गाडी क्रमांक 02951/52 मुंबई-नवी दिल्ली राजधानी विशेष एक्स्प्रेसचे सध्याचे रेक्स बदलून त्या जागी आता नवीन तेजस प्रकारचे कोरे करकरीत शयनयान पद्धतीचे डबे जोडले गेले आहेत. अशा प्रकारचे डबे जोडलेले दोन रेक्स राजधानी एक्स्प्रेस म्हणून धावण्यासाठी सज्ज आहेत. या दोन रेक्सपैकी, एकामध्ये फक्त तेजस स्मार्ट शयनयान पद्धतीचे डबे आहेत आणि भारतीय रेल्वेमधील अशा प्रकारची ती पहिलीच गाडी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरामासाठी नवीन गाडीमध्ये खास स्मार्ट सुविधा असणार आहेत. बुद्धिमान सेन्सरवर आधारित प्रणालीच्या मदतीने, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्याचे स्मार्ट डब्यांचे उद्दिष्ट आहे. यामध्ये PICCU म्हणजे 'प्रवासी माहिती आणि डबे गणना एकक (Passenger Information and Coach Computing Unit)' बसवलेले असून त्यास जीएसएम कनेक्टिव्हिटीही असणार आहे. दूरस्थ सर्व्हरशी ही प्रणाली जोडलेली असेल. या प्रणालीमध्ये सुरक्षा आणि आरामाशी संबंधित विविध उपकरणांकडून मिळणारी माहिती नोंदली जाईल- जसे की-  डब्ल्यू.एस.पी., सीसीटीव्ही मुद्रणे, शौचालयातील दुर्गंधी ओळखणारे सेन्सर्स, पॅनिक स्विच (भीतिदायक प्रसंगी सुटकेसाठी), आग लागल्याचे निदान करणारी व धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा, हवेची गुणवत्ता मोजणारा सेन्सर, ऊर्जामापक इत्यादी.

अतिरिक्त स्मार्ट वैशिष्ट्ये:

 पीए / पीआयएस (प्रवासी घोषणा / प्रवासी माहिती प्रणाली): प्रत्येक कोचमध्ये  दोन एलसीडी प्रवाशांना पुढील स्थानक यासारख्या  प्रवासा संदर्भातील महत्वाची माहिती दर्शवतात.

डिजिटल डेस्टिनेशन बोर्डः फ्लश सारखा  एलईडी डिजिटल डेस्टिनेशन बोर्ड बसवण्यात आला आहे. पहिल्या ओळीत  गाडीचा क्रमांक आणि कोच प्रकार आहे तर दुसऱ्या ओळीत विविध भाषांमध्ये गंतव्यस्थान आणि मधल्या स्थानकाचा स्क्रोलिंग मजकूर दाखवण्यात येतो.

सुरक्षा आणि देखरेख : प्रत्येक कोचमध्ये 6 कॅमेरे बसवण्यात आले आहेत जे लाईव्ह  रेकॉर्डिंग देतात. डे नाईट व्हिजन क्षमतेसह सीसीटीव्ही कॅमेरे, कमी प्रकाशाच्या  स्थितीत चेहर्‍याची ओळख पटवणे , नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर उपलब्ध आहे.

ऑटोमॅटिक प्लग दरवाजा: सर्व मुख्य प्रवेशद्वारे गार्डद्वारे नियंत्रित आहेत.  सर्व दरवाजे बंद होईपर्यंत गाडी  सुरू होणार नाही.

फायर अलार्म, डिटेक्शन आणि सप्रेशन प्रणाली -  सर्व डब्यांमध्ये ऑटोमॅटिक फायर अलार्म आणि डिटेक्शन प्रणाली उपलब्ध आहे. पॅन्ट्री आणि पॉवर कारमध्ये  स्वयंचलित अग्नि शमन  प्रणाली आहे.

वैद्यकीय किंवा सुरक्षा संबंधी आपत्कालीन परिस्थितीसाठी आपत्कालीन संवाद प्रणाली

सुधारित शौचालय  युनिट: अँटी-ग्राफिटी कोटिंग, जेल कोटेड शेल्फ, नवीन डिझाइनचे  डस्टबिन, डोअर लॅच अ‍ॅक्टिवेटेड लाइट, एंगेजमेंट डिस्प्ले बसवण्यात आले आहेत.

 टॉयलेट ऑक्युपन्सी सेन्सर: प्रत्येक कोचमध्ये टॉयलेट ऑक्युपन्सी स्वयंचलित पद्धतीने दाखवते

लॅव्हॅटरीजमध्ये पॅनीक बटणः कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक लव्हॅरेटरीमध्ये बसवले आहे टॉयलेट एनॉनसिएशन सेन्सर इंटिग्रेशन (TASI): प्रत्येक कोचमध्ये दोन टॉयलेट एनाॅनसिएशन  सेन्सर इंटिग्रेशन  बसवण्यात आले आहे, जे कुणी आत असेल तेव्हा काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती दाखवेल.

बायो-व्हॅक्यूम टॉयलेट सिस्टमः सुधारित फ्लशिंगमुळे शौचालयात स्वच्छता सुधारणा  आणि प्रत्येक फ्लशमागे  पाण्याची बचत देखील होते.

एअर सस्पेंशन बोगी: प्रवाशांना आरामदायी अनुभव देण्यासाठी  आणि या डब्यांचा प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी बोगींमध्ये एअर स्प्रिंग सस्पेंशन प्रदान करण्यात आले आहे.

वास्तविक वेळेच्या आधारावर पाण्याची उपलब्धता दर्शवण्यासाठी वॉटर लेव्हल सेन्सर

 टेक्सचर्ड एक्सटेरिअर पीव्हीसी फिल्म: बाहेरील बाजूला टेक्सचर्ड पीव्हीसी फिल्म लावली आहे.

 सुधारित इंटिरिअर्स: आग प्रतिबंधक  सिलिकॉन फोम असलेल्या सीट आणि बर्थमुळे प्रवाशांना अधिक आराम आणि सुरक्षा मिळते.

 मोबाइल चार्जिंग पॉईंट्स: प्रत्येक प्रवाशासाठी

 बर्थ रिडींग लाईट : प्रत्येक प्रवाशासाठी

 अपर  बर्थ क्लाइंबिंग व्यवस्था: सोयीस्कर अपर  बर्थ  व्यवस्था.

 

MC/SK/JW/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736881) Visitor Counter : 263