भूविज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांची मोसम भवनला भेट, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुख्यालयात केली मोसमी पर्जन्य कलांची पाहणी
आगामी काळात मोसम विभाग आणखी रडार खरेदी करणार
Posted On:
18 JUL 2021 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2021
- यंदा मोसमी पाऊस जूनमध्ये सरासरीपेक्षा 10% जास्त, आणि जुलैमध्ये आतापर्यंत 26% कमी
- कृषी मंत्रालयाच्या 'एम किसान पोर्टलद्वारे' भारतीय हवामानशास्त्र विभाग देशातील शेतकऱ्यांना आठवड्यातून दोनदा 4.2 कोटींपेक्षा अधिक एसएमएस पाठवतो
केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार), भूविज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री, अणुऊर्जा विभागाचे आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्रसिंग यांनी आज मौसमभवन येथे भेट दिली. भूविज्ञान मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या आयएमडी अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुख्यालयात मोसमी पर्जन्य कलांची त्यांनी पाहणी केली.
सध्या इतर अत्याधुनिक आणि अद्ययावत उपकरणांखेरीज आयएमडीकडे देशभरात मिळून 27 रडार कार्यरत असून येत्या काही वर्षांत ही संख्या 50 पर्यंत जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी डॉ. जितेंद्रसिंग यांना यावेळी दिली.
हवामानाची भाकिते वर्तवणाऱ्या माहितीचे विश्लेषण हे एक जटिल काम असल्याचे सांगत, अधिकाधिक अचूक भाकिते वर्तवण्यावर विशेष लक्ष देण्याची विनंती डॉ.जितेंद्र सिंग यांनी यावेळी शास्त्रज्ञांना केली. विशेषतः कृषी क्षेत्रात तसेच महापूर, चक्रीवादळे, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती ओढवणाऱ्या भौगोलिक क्षेत्रांत लोकांसाठी उपयुक्त सेवा-सुविधा पुरवण्याकडे लक्ष देण्याचेही त्यांनी अधिकारीवर्गास सुचविले. यासाठी ऍप्स आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या पर्यायांचा वापर करता येईल असेही ते म्हणाले.
यावेळी आयएमडीचे महासंचालक डॉ.मृत्युंजय मोहपात्रा यांनी एका लहानशा सादरीकरणाद्वारे, यावर्षीच्या मोसमी पावसाची माहिती मंत्रीमहोदयांना दिली. यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा 10 टक्के अधिक पाऊस झाला तर जुलैमध्ये मात्र आतापर्यंत 26 टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी मंत्रालयाच्या एम-किसान पोर्टलचा शेतकऱ्यांच्या हितासाठी उचित उपयोग करून घेत सध्या, भारतीय हवामानशास्त्र विभाग देशातील शेतकऱ्यांना आठवड्यातून दोनदा 4.2 कोटींपेक्षा अधिक एसएमएस पाठवतो अशी माहिती मंत्रीमहोदयांना यावेळी देण्यात आली. वीज कोसळण्याचे भाकीत वर्तवणारी सर्वात आधुनिक प्रणाली वापरणाऱ्या पाच देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचे डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले.



S.Thakur/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736617)
Visitor Counter : 204