मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाने राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन केला साजरा

Posted On: 10 JUL 2021 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2021

 

राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाने राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन आभासी माध्यमातून साजरा केला. देशभरातील सर्व मच्छीमार , मत्स्यउत्पादक  आणि संबंधित भागधारकांप्रती  एकता  दर्शविण्यासाठी राष्ट्रीय मत्स्य उत्पादक  दिन दरवर्षी साजरा केला जातो. 10 जुलै, 1957 रोजी देशात प्रथमच ओडिशाच्या अंगुल येथे गोड्या पाण्यात मोठ्या माशाच्या प्रजातीचे  यशस्वी प्रजनन साध्य करण्यासाठी प्राध्यापक डॉ.  हिरालाल चौधरी आणि त्यांचे सहकारी डॉ. अलीकुन्ही यांनी दिलेल्या  योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

अशाप्रकारच्या  प्रजननाचे हे अग्रणी कार्य असून यामुळे पारंपरिक ते सघन असे मत्स्यशेतीत परिवर्तन झाले आणि आधुनिक मत्स्यपालन उद्योगाला  यश मिळू शकले. हा दिवस राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाचा  स्थापना दिन म्हणूनही साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास  मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी देशांतर्गत मत्स्य वापरासंदर्भातील  जिंगल्सचे प्रकाशन केले  आणि देशांतर्गत माशांच्या वापरावर “टॅगलाईन / स्लोगन स्पर्धा विजेते” जाहीर केले.

या प्रसंगी बोलताना श्री. रुपाला म्हणाले की,  देशाला तीन बाजूंनी विशाल किनारपट्टी लाभल्याने  मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी  प्रचंड क्षमता असल्यामुळे  याचा फायदा झाला आहे.या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली. सरकारने सुरू केलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत आणि   शेवटच्या मच्छीमारांपर्यंत पोहोचविणे सुनिश्चित करावे  असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.हा दिवस राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाचा 15 वा स्थापना दिन म्हणून साजरा केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी मंडळाचे  अभिनंदन केले.

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास  राज्यमंत्री श्री.एल. मुरुगन म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबरच  पोषक सुरक्षेचीही  मागणी आहे आणि ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मासे हा एक उत्कृष्ट स्त्रोत आहेत. ते म्हणाले की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही आत्मनिर्भर भारत अंतर्गत पंतप्रधानांनी जाहीर केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे.ही योजना माशांच्या उत्पादनास निश्चितच चालना देईल आणि मच्छीमारांच्या जीवनात बदल घडवून आणेल.वेगवेगळ्या माशांच्या जातींच्या प्रजननासाठी संशोधन संस्थांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

देशभरातील सुमारे 500 मत्स्य उत्पादक, मत्स्य उद्योजक आणि मच्छिमार , व्यावसायिक, अधिकारी आणि  शास्त्रज्ञांनी या कार्यक्रमात  भाग घेतला.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1734494) Visitor Counter : 355


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil