वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आर्थिक सहकार्यासाठी भारत-इटली संयुक्त आयोगाचे 21 वे अधिवेशन

Posted On: 10 JUL 2021 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2021

 

आर्थिक सहकार्यासाठी भारत-इटली संयुक्त आयोगाचे 21 वे अधिवेशन 09 जुलै 2021 रोजी आभासी पध्दतीने पार पडले. वाणिज्य आणि  उद्योग मंत्री पियुष गोयल आणि इटलीचे परराष्ट्र व्यवहार व आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री लुईगी दि मैयो यांनी या अधिवेशनाचे सह-अध्यक्षपद भूषवले.

दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक आणि अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग, चामडे, रेल्वे, स्टार्ट-अप क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य आणि आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या छोट्या आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याबाबत विस्तृत चर्चा केली . व्यापार आणि गुंतवणूक सुलभ करण्यासाठी द्विपक्षीय बाजारपेठेतील प्रवेशविषयक समस्या यावर यावेळी चर्चा झाली. पोर्तुगालच्या पोर्टो मधील भारत-युरोपियन युनियन नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निष्पत्तीवरील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

भारताकडून कोविन लस प्रमाणपत्राला परस्पर मान्यता आणि प्रवासी निर्बंध, व्यवसाय व्हिसाच्या कालावधीत वाढ आणि इटलीमध्ये काम करणाऱ्या भारतीयांच्या सामाजिक सुरक्षेच्या लाभांचे हस्तांतरण आदी मुद्दे मांडण्यात आले.

भारत-इटली जेसीईसी जी 2 जी बैठकीनंतर दोन मंत्र्यांच्या  उपस्थितीत ऊर्जा भागीदारीवर लक्ष केंद्रित करणारे G2B सत्र व्हर्च्युअली पार पडले. या बैठकीत 3 भारतीय कंपन्या (इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, अदानी सोलार, रीन्यू पॉवर) आणि 3 इटालियन कंपन्यांनी (इनेल ग्रीन पॉवर, स्नाम, मैरे टेक्निमोन्ट) हरित अर्थव्यवस्था, स्वच्छ तंत्रज्ञान आणि ग्रीड-आधारित बहु -उर्जा प्रणालीसाठी नवीकरणीय ऊर्जेच्या वापराच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करून सादरीकरण केले. या अधिवेशनादरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी  ऊर्जा संक्रमण, तंत्रज्ञान आणि हवामान विषयक भागीदारीचा लाभ घेण्यासाठी 6 नोव्हेंबर 2020 रोजी भारत आणि इटलीच्या पंतप्रधानांनी स्वीकारलेल्या कृती आराखड्यांतर्गत दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला. महत्वाकांक्षी स्वच्छ उर्जा उद्दीष्टांचा अवलंब करण्याच्या दृष्टीने बहु-पक्षीय मंचावर भारत आणि इटलीने पार पाडलेली भूमिका त्यांनी अधोरेखित केली आणि परस्पर ऊर्जा क्षमता वाढवण्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी दोन्ही देशांच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांना आमंत्रित केले.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734421) Visitor Counter : 218