संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा लडाख दौरा : सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात सीमा रस्ते संघटनेने बांधलेल्या 63 पुलांचे राष्ट्रार्पण
Posted On:
28 JUN 2021 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात सीमा रस्ते संघटनेने बांधलेले 63 पुल आज राष्ट्राला अर्पण केले. लडाख या केंद्र शासित प्रदेशात लेहपासून 88 किमीवर असलेल्या क्युन्गम इथे हा कार्यक्रम झाला.
लडाखमध्ये लेह-लोमा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या 50 मीटर लांबीच्या रस्त्याचे उद्घाटन त्यांनी क्युन्गम इथून केले. पोलादाची बांधणी असलेला हा पूल सध्याच्या बेली पुलाची जागा घेणार आहे. या नव्या पुलामुळे, बंदुका, रणगाडे,आणि इतर साधने यासारख्या अवजड शस्त्र प्रणालीची विना अडथळा, सहज ने-आण सुनिश्चित होणार आहे. लेह-लोमा रस्ता, पूर्व लडाखमधल्या चुमथांग, हानले आणि त्सो मोरोरी तलाव या सारख्या सीमेजवळच्या भागांशी लेहला जोडतो.
याशिवाय राजनाथ सिंह यांनी दूर दृश्य प्रणाली द्वारे 62 पुलांचे उद्घाटन केले. यापिकी 11 लडाखमध्ये, 4 जम्मू आणि काश्मीर, 3 हिमाचल प्रदेश, सहा उत्तराखंड, 8 सिक्कीम, अरुणाचल प्रदेश 29 तर मणिपूर आणि नागालँडमधल्या प्रत्येकी एका पुलाचा समावेश आहे. या सर्वांचा एकत्रित खर्च 240 कोटी असून या पुलांमुळे सीमावर्ती भागातल्या कनेक्टीव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे.
दुर्गम भागात कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यासाठी, विशेषकरून कोरोना -19 महामारीच्या काळात सीमा रस्ते संघटनेच्या कटीबद्धतेची राजनाथ सिंह यांनी प्रशंसा केली. यातले काही पूल दुर्गम भागातल्या अनेक खेड्यांसाठी जीवनवाहिनी ठरतील असे ते म्हणाले. देशाच्या विकासासाठी कनेक्टीव्हिटीचे महत्व विशेषकरून सीमावर्ती भागातल्या कनेक्टीव्हिटीचे महत्व अधोरेखित करत दुर्गम सीमावर्ती भागात पायाभूत विकास सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला.
एकाच वेळी 63 पुलांचे उद्घाटन करून सीमा रस्ते संघटनेने 2020 मधला 44 पुलांच्या उद्घाटनाचा आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. आज लोकार्पण करण्यात आलेले 63 पूल आणि राजनाथ सिंह यांनी 17 जून 2021 ला राष्ट्रार्पण केलेले 12 रस्ते असे मिळून सीमा रस्ते संघटनेने पूर्ण केलेल्या 75 पायाभूत प्रकल्पाचा एक गुच्छ, देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना तयार झाला आहे.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731005)
Visitor Counter : 314