आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

'क्षयमुक्त भारत भागीदार बैठक' डॉ.हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न


"क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत योद्धे म्हणून माध्यमातील प्रसिद्ध व्यक्तींचा उपयोग करून घेता येईल, क्षयरोगाशी लढा देण्यासाठी सर्वोत्तम उपाय व कृती करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा लागू करणार"

Posted On: 24 JUN 2021 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2021

 

'क्षयमुक्त भारत भागीदार बैठक' आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आरोग्य मंत्रालयाच्या विविध विकासात्मक भागीदारांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत भाग घेतला. क्षयरोगाशी सामना करण्यासंबंधी झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही चौथी बैठक होती.

यावेळी बोलताना डॉ.हर्षवर्धन म्हणाले, "देशातून पोलिओचे निर्मूलन करण्यात प्रसारमाध्यमांनी, विशेषतः दूरदर्शनने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्याच धर्तीवर, क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी पत्रकार आणि माध्यमातील प्रसिद्ध व्यक्तींचा उपयोग या लढाईत योद्धे म्हणून करून घेता येईल." त्याचप्रमाणे, क्षयरोगाशी लढा देण्यासाठी सर्वोत्तम उपाय व कृती करण्यासाठी तसेच उत्तमोत्तम संकल्पना व्यवस्थेत आणण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा लागू करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नेतृत्व आणि सामुदायिक सहभाग यांचे महत्त्व हर्षवर्धन यांनी अधोरेखित केले. 'अशा दृष्टीने विचार करून धार्मिक नेते व ऑटोचालक संघटनांचे नेते यांना क्षयाबद्दलच्या जनजागृती मोहिमेत सामील करून घेता येईल', अशी कल्पना त्यांनी मांडली. ज्या पाच राज्यांमध्ये क्षयरुग्णांची संख्या जास्त आहे अशा राज्यांसाठी प्रतिमाने विकसित करण्याची व सुस्पष्ट धोरणे आखण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या राज्यांमध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि तेलंगण यांचा समावेश होतो.

* * *

S.Patil/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730174) Visitor Counter : 222