रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग/ नियंत्रित वापर महामार्गांच्या प्रगतीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आढावा

Posted On: 22 JUN 2021 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2021

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज देशातील पाच ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग आणि 17 नियंत्रित वापर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गांचे कंत्राट,बोली आणि बांधकाम पूर्व कामांचा आढावा घेतला. भारतमाला प्रकल्प-पहिला टप्पा, या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पथदर्शी कार्यक्रमाअंतर्गत, हे महामार्ग बांधले जाणार आहेत.  8000 किलोमीटरच्या या एकूण 22 ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी 3.26 लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. देशातली उत्पादन केंद्रे आणि औद्योगिक तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या मालाची निर्वेध आणि गतिमान वाहतूक करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या महामार्गांमुळे देशातील लॉजिस्टिक क्षमता वाढणार आहे. त्यासोबतच, देशात प्रवासी आणि मालवाहतूक जलद होण्यातही त्यांचा उपयोग होईल.

या रस्त्याच्या बांधकामाचे कंत्राट देण्याची प्रक्रिया, बोली, बांधकामपूर्व प्रक्रियेतील अडथळे, विशेषतः भूसंपादन, पर्यावरणविषयक मंजुरी या सर्व गोष्टींबाबतचे सविस्तर सादरीकरण यावेळी गडकरी यांच्यासमोर करण्यात आले. विविध राज्य सरकारांशी सबंधित मुद्दे लवकरात लवकर सोडवावेत असे निर्देश, यावेळी गडकरी यांनी दिले. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर योग्य वेळेतच त्यांचा व्यावहारिक उपयोग सुरु करण्यावर  तसेच रस्ते वापरणाऱ्या लोकांसाठी आवश्यक सुविधा तयार करण्यावर गडकरी यांनी भर दिला.  

महामार्ग पूर्ण करण्यासाठीच्या नियोजनातील उद्दिष्टे वेळेत पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जावे. त्याचवेळी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेशी कुठलीही तडजोड केली जाऊ नये,सर्वोत्तम दर्जाचे महामार्ग तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश गडकरी यांनी दिले. या बैठकीला रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, NHAI चे अध्यक्ष आणि इतर अधिकारी उपस्थित  होते.

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1729468) Visitor Counter : 199