आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लसीकरणाबद्दलच्या गैरसमजांचे निराकरण


कोविशील्डच्या मात्रांमधील अंतरात तातडीने बदल करण्याची गरज नाही-: सदस्य, नीती आयोग

"उचित वैज्ञानिक प्रक्रियेचा अंगीकार करून लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या निर्णयाचा आदर करूया"

"कोविशील्डच्या मात्रांमधील अंतर कमी करण्यासाठी आपल्या देशाच्या परिस्थितीनुसार योग्य शास्त्रशुद्ध अभ्यास आवश्यक"

Posted On: 11 JUN 2021 10:06PM by PIB Mumbai

 

नुकत्याच केलेल्या अभ्यासाचा दाखला देणारे प्रसारमाध्यमातील काही अहवाल असे सांगतात की, 'विषाणूचे निरनिराळे प्रकार पाहता, कोविशील्डच्या मात्रांमधील अंतर कमी करणे इष्ट ठरेल.'

मात्र, नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी आश्वासकपणे असे सांगितले आहे की, "मात्रांमधील अंतर तातडीने कमी करण्यावरून चिंताक्रांत होण्याची आवश्यकता नाही." ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय माध्यम केंद्रात कोविड -19 विषयी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणतात, "चिंताक्रांत होत मात्रांमधील अंतरात तातडीने बदल सुचवण्याची आवश्यकता नाही. हे सर्व निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतले पाहिजेत. आपण जेव्हा अंतर वाढविले, तेव्हा एकच मात्रा टोचून घेतलेल्यांना विषाणूमुळे असणाऱ्या धोक्याचाही आपण विचार केला होता, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मात्र यापेक्षा आणखी महत्त्वाचा मुद्दा असा होता की, अधिक लोकांना पहिली मात्रा देता येईल, जेणेकरून अधिक लोकांना थोडीतरी प्रतिकारशक्ती मिळेल." डॉ. पॉल यांनी असेही सांगितले की, "या विचारांमध्ये समतोल राखला पाहिजे. त्यामुळे कृपया हे जरूर लक्षात ठेवा, की सार्वजनिक रीत्या यावर चर्चा आणि विचारविनिमय झालाच पाहिजे; परंतु निर्णय मात्र याबद्दलचे ज्ञान असलेल्या व्यक्तींच्या उचित मंचानेच घेतला पाहिजे."

नीती आयोगाच्या (आरोग्य) सदस्यांनी अशीही माहिती दिली की, "आपल्या NTAGI म्हणजे लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटामध्ये, जागतिक आरोग्य संघटनेच्या समित्यांचे सदस्य असलेल्याही काही व्यक्ती आहेत. ज्ञान, अनुभव आणि ज्येष्ठतेच्या संबंधाने त्या स्वतःच्या क्षेत्रातील जगद्विख्यात व्यक्ती आहेत. शिवाय, जागतिक आणि राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांच्या संदर्भात NTAGI ला विशेष गुणवत्तापूर्णतेचा मान आहे. त्यामुळे कृपया त्यांच्या निर्णयांचा आदर करा."

या विषयावर होत असलेल्या चर्चेचे स्वागत करत डॉ.पॉल यांनी, असे निर्णय घेताना उचित वैज्ञानिक प्रक्रियेचा अंगीकार करण्याची गरज अधोरेखित केली. जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या NTAGI ने घेतलेल्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. "मात्रांमधील अंतराचा निर्णय NTAGI ला उचित प्रक्रियेद्वारे तपासून पाहूद्या. युनायटेड किंग्डमने (यूके) त्यांचा जुना निर्णय बदलण्यासाठी उचित प्रक्रिया पार पाडून प्राप्त माहितीचे शास्त्रशुद्ध परीक्षण केले असावे. यूकेने पूर्वी मात्रांमध्ये 12 आठवड्यांचे अंतर ठेवले होते. मात्र, आपल्याला उपलब्ध माहितीनुसार आम्हाला ते त्यावेळी सुरक्षित वाटले नाही. म्हणून आपल्या वैज्ञानिकांनी त्यावर आधीच विचारविनिमय सुरु केला असेल हे लक्षात घेऊन आता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून शांत राहूया. आपल्या देशातील महामारीच्या स्थितीनुसार, आपल्या देशातील डेल्टा प्रकारच्या प्रादुर्भावाच्या स्थितीनुसार सर्वंकष विचार करून ते त्यात बदल करतील. आपल्या शास्त्रज्ञांचा जो काही निर्णय असेल, त्याचा आपण सन्मानच करू." असे डॉ.पॉल यांनी सांगितले.

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor



(Release ID: 1726400) Visitor Counter : 180


Read this release in: English , Hindi , Punjabi , Telugu