वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जागतिक दुग्ध दिनानिमित्त 'एपीडा' (APEDA) ने मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धोत्पादन मंत्रालयाच्या सहयोगाने देशातील दुग्धजन्य पदार्थांची निर्यातक्षमता वाढवण्यासाठी वेबिनार आयोजित केले
Posted On:
01 JUN 2021 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2021
आजच्या जागतिक दुग्ध दिनानिमित्त 'एपीडा' (APEDA) ने मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धोत्पादन मंत्रालयाच्या (MFAHD) सहयोगाने देशातील दुग्धजन्य पदार्थांची निर्यातक्षमता जोखण्यासाठी वेबिनार व चर्चासत्र आयोजित केले होते.
भारत दुग्धोत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर असून निर्यातीसाठी पुरेसे अतिरिक्त उत्पादन होत असल्याचे, मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धोत्पादन मंत्रालयाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता दुग्धजन्य पदार्थांत असल्याचा महत्वाचा धडा कोविड मुळे मिळाल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
दुभत्या गाईम्हशींच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी लसीकरणाच्या गरजेवर त्यांनी भर दिला. केंद्रीय क्षेत्र योजने अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. "अशा उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील पशुधनाला खुरे व तोंडातील रोगांपासून मुक्ती देण्याचे ध्येय आपण लसीकरण केल्यास 2025 सालपर्यंत तर लसीकरणाशिवाय 2030 सालपर्यंत पूर्ण करू शकतो."
गुरांचे पोषण होण्यासाठी उत्तम प्रतीचा चारा व पशुखाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 'पशुआधार' योजनेद्वारे पशूंची गणना व नोंदणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 'आत्मनिर्भर भारत अभियान' अंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धोत्पादन मंत्रालयाच्या 'पशुपालन पायाभूत सुविधा विकास मंडळ'(AHIDF) तर्फे योजना आखल्याचे ते म्हणाले. पशुखाद्य निर्मिती संयंत्रे, दुग्धप्रक्रिया व मूल्यवर्धन सुविधा उभ्या करण्यासाठी उद्योजक, खाजगी कंपन्या, मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था ( FPO) व कंपन्यांना प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धोत्पादन मंत्रालयाच्या सहसचिव डॉ वर्षा जोशी यांनी सांगितले. दुग्धपदार्थांच्या निर्यातदारांना सहाय्य करण्यासाठी गुंतवणूक प्रोत्साहन कक्ष स्थापन केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुग्धजन्य पदार्थांची जगभरात कुठेही थेट निर्यात करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था (FPO), दुग्धोत्पादक शेतकरी किंवा सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत एपिडा(APEDA) चे अध्यक्ष डॉ एम अंगामुथु यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मिनेश शाह यांनीही देशातील दुग्धोत्पादन क्षेत्रातील सद्यस्थितीचा आढावा घेतला.
गुजरात सहकारी दुग्ध विपणन संघटनेचे (GCMMF) अर्थात 'अमूल' चे व्यवस्थापकीय संचालक डॉ आर एस सोधी यांनी दुग्ध निर्यातदारांना येणाऱ्या अडचणी यावेळी मांडल्या. दुग्धजन्य पदार्थांची आयात करणाऱ्या प्रमुख देशांनी भारतातून निर्यात होणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांवर वाढीव आयात शुल्क लावल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
* * *
S.Tupe/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723473)
Visitor Counter : 212