विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
डीएसटीच्या सहकार्याने एन-95 मास्क/पीपीई वैद्यकीय आणि बिगर-वैद्यकीय उपकरणांचे निर्जंतुकीकरण करण्याची प्रणाली विकसित; तसेच कोविड-19 शी संबंधित जैव-वैद्यकीय कचरानिर्मिती कमी करण्यातही मदत
आयआयटी मुंबईतील जैवविज्ञान आणि जैव-अभियांत्रिकी विभागाकडून या प्रणालीची चाचणी आणि मान्यता
Posted On:
27 MAY 2021 8:04PM by PIB Mumbai
मुंबईतल्या ‘इंद्रा वॉटर’ या स्टार्ट-अप कंपनीने एन-95 मास्क/पीपीई चे निर्जंतुकीकरण करण्याची प्रणाली विकसित केली असून महाराष्ट्र आणि तेलंगणातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली आहे.
‘वज्र कवच’ असे नाव असणारी ही निर्जंतुकीकरण प्रणाली पुनर्वापर करण्यास योग्य असे पीपीई सूट्स, वैद्यकीय आणि बिगर-वैद्यकीय उपकरणे यांच्यासाठी होणारा खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरली आहे. तसेच कोविड-19 शी संबंधित जैव-वैद्यकीय कचरानिर्मिती कमी करण्यातही मदत करत असल्याने ती पर्यावरणपूरकही आहे. वैयक्तिक संरक्षणविषयक उपकरणे अधिक प्रमाणात आणि किफायतशीर दरात तसेच सहज उपलब्ध करणे, यासाठीही या प्रणालीची मदत होते आहे.
या प्रणालीत, विविध पातळ्यांवर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते. यात अद्ययावत पद्धतीने ऑक्सिडेशन, कोरोना डिस्चार्ज आणि यु-व्ही-सी किरण स्पेक्ट्रमचा वापर करुन पीपीई वरील विषाणू, जीवाणू तसेच इतर सूक्ष्म जीव निष्क्रिय करण्याची प्रक्रिया 99.999% सक्षमतेने केली जाते.
‘इंद्रा वॉटर’ या स्टार्ट अप कंपनीला जलक्षेत्रात संशोधन करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या निधी-प्रयास (NIDHI-PRAYAS) या उपक्रमाच्या माध्यमातून, आयआयटी मुंबईच्या SINE मार्फत अनुदान मिळाले आहे. कोविड-19 विरुद्धचा लढा अधिक मजबूत करण्यासाठी, ‘कवच’(CAWACH) अंतर्गत मिळालेल्या निधीचा वापर करत, कोविड-19 चा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात अनुकुल बदल केला जात आहे. आयआयटी मुंबईने, SINE च्या सहकार्याने, दर महिन्याला 25 निर्जंतुकीकरण प्रणालींचे उत्पादन करण्याची सज्जता केली आहे.
आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैव-अभियांत्रिकी विभागाने या प्रणालीची चाचणी केली असून मान्यताही दिली आहे. या प्रणालीद्वारे, 5 LOG पेक्षा अधिक म्हणजेच, 99.999% विषाणू आणि जीवाणू निष्क्रिय करण्यात यश मिळाल्याचे आढळले आहे. तसेच CSIR – NEERI ने देखील या प्रणालीला मान्यता दिली असून, IP55 चे प्रमाणपत्रही त्याला मिळाले आहे. देशभरातल्या अनेक कोविड रुग्णालयात, आता ही प्रणाली स्थापन केली जाते आहे.
(अधिक माहितीसाठी श्री अभिजित (abhijit@indrawater.com ,+91 99666 95436) यांच्याशी संपर्क साधावा.)
***
M.Pange/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722270)
Visitor Counter : 229