अर्थ मंत्रालय

केंद्र सरकारच्या विशेष खिडकी उपक्रमाचा पहिला निवासी प्रकल्प पूर्ण


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आभासी बैठकीद्वारे गृहखरेदीदाराना ताबा हस्तांतरित केला

Posted On: 13 MAY 2021 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2021

केंद्र सरकारच्या परवडण्याजोग्या आणि मध्यम उत्पन्न गृहनिर्माण (एसडब्ल्यूएएमआयएच) साठी विशेष खिडकी उपक्रमाने आपला पहिला निवासी प्रकल्प पूर्ण केला असून केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आभासी माध्यमातून घर खरेदीदारांना या घरांचा ताबा दिला.

मुंबई उपनगरात स्थित रिवली पार्क हा निवासी प्रकल्प भारतातील पहिला गृहनिर्माण प्रकल्प आहे ज्याला एसडब्ल्यूएएमआयएच (SWAMIH Fund)अंतर्गत निधी मिळाला. या निधीची सुरुवात सीतारामन यांनी  नोव्हेंबर 2019 मध्ये केली होती.

रिवाली पार्क विंटरग्रीन्स ही या निधीची पहिली गुंतवणूक आहे तसेच पूर्ण होणारा हा पहिला प्रकल्प आहे. 7 एकर जागेवर वसलेला आणि विविध आकारमानाची 708 घरे असलेला हा एक मोठा प्रकल्प आहे.  रिवाली पार्क विंटरग्रीन हा   प्रकल्प केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची सहयोगी कंपनी सीसीआय प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (सीसीआयपीपीएल) यांनी विकसित केला आहे.

या कार्यक्रमाला  सीतारामन यांच्यासह  अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर ,गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव  दुर्गा शंकर मिश्रा, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, अतिरिक्त सचिव, आर्थिक व्यवहार विभाग  के. राजारामन, ,  दिनेश कुमार खारा, अध्यक्ष, एसबीआय, आणि एसबीआयसी कॅप व्हेंचर्स लिमिटेडचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

या आभासी कार्यक्रमाला  संबोधित करताना अर्थमंत्री  सीतारामन म्हणाल्या की स्वामी (SWAMIH) निधीने आपला पहिला निवासी प्रकल्प पूर्ण केला हे पाहून  खूप आनंद झाला. शिवाय, कोविड -१९ च्या  कठीण काळात हे काम पूर्ण  केले असल्यामुळे  ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, असेही त्या म्हणाल्या.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र  सरकारने  परवडणारी आणि मध्यम उत्पन्न गटाच्या  गृहनिर्माण प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्यासाठी पाऊल उचलले आहे आणि त्यामुळे कमाईतून बचत करून घर खरेदीत गुंतवणूक केलेल्याना  दिलासा मिळाला आहे. त्या  म्हणाले की, सरकारचा  विश्वास आहे की एकदा ही घरे बांधून पूर्ण झाली की या प्रकल्पांमध्ये अडकलेले मोठे भांडवल   उपलब्ध होईल..

यामुळे बांधकाम कामगारांना रोजगार मिळेल  आणि पोलाद व सिमेंट सारख्या उद्योगांना चालना मिळेल  असे अर्थमंत्री म्हणाल्या . तसेच  बँका आणि गैर बँकिंग वित्तीय संस्थांचे पोर्टफोलिओ सुधारतील आणि देशातील आर्थिक घडामोडींमध्ये  लक्षणीयरीत्या सुधारणा होईल.

धोरणात्मक घोषणेचे थोड्याच  कालावधीत महत्त्वपूर्ण प्रगती करणाऱ्या निधी संस्थेत रूपांतर केल्याबद्दल सीतारामन यांनी एसबीआयकॅप व्हेन्चर्स टीमचे अभिनंदन आणि प्रशंसा केली .

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव  दुर्गा शंकर मिश्रा यांनी आपल्या भाषणात सांगितले की गृहनिर्माण उद्योग हे  भारतातील रोजगार निर्मितीचे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र  आहे आणि गेल्या काही वर्षांत गृहनिर्माण मंत्रालयाने  अनेक पावले उचलली आहेत, ज्यामुळे हे  क्षेत्र तग धरून आहे. रेरा,  जीएसटी दर कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेमुळे या क्षेत्राला मदत झाली आहे.

एसबीआयचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा आपल्या भाषणात म्हणाले की एसबीआय आणि भागीदारांसमोर मांडण्यात आलेल्या मोठ्या अपेक्षा साध्य करण्यासाठी या निधीचे उत्तम  व्यवस्थापन केले जात आहे. बांधकाम क्षेत्राचे पुनरुज्जीवन आणि गृहखरेदीदारांना दिलासा देण्याच्या सरकारच्या संकल्पनेप्रती   एसबीआय समूह पूर्णपणे वचनबद्ध आहे .  खारा म्हणाले की मागील 15 महिन्यांत एसबीआयने उत्तम कामगिरी केली आहे जी साध्य करण्यासाठी अन्य खाजगी इक्विटी फंडांना  साधारणत: 3 ते  4 वर्षे लागतात.

SWAMIH बद्दल माहिती

प्रारंभापासून 1.5 वर्षांच्या अल्पावधीत, SWAMIH गुंतवणूक निधी आज भारतातील सर्वात मोठ्या खाजगी इक्विटी निधीपैकी एक आहे आणि कोविड -19 काळात  निर्बंध असूनही कौतुकास्पद कामगिरी केली  आहे. या निधीने  आतापर्यंत 72 प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिली असून या अंतर्गत 44,100 घरे बांधली जातील तर  132  प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी मिळाली असून, यात  आणखी 72,500 घरे बांधण्यात येतील. अशा प्रकारे, एकूण 1,16,600 घरे बांधण्याचे  लक्ष्य या निधीचे  आहे. हा निधी  गृहखरेदीदार आणि विकसकांमधील विश्वासातील दरी सांधत  आहे आणि वित्तपुरवठा करण्याच्या इतर कोणत्याही स्रोतावर अवलंबून नाही.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718394) Visitor Counter : 246