आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कॅबिनेट सचिवांनी देशातील कोविड परिस्थितीचा घेतला आढावा
लसींची नासाडी कमीत कमी होईल याकडे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी लक्ष द्यावे
प्राणवायूचे तर्कसंगत व न्यायोचित उपयोजन झाले पाहिजे
ग्रामीण भागात कोविड काळजीविषयी जनजागृती करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि सामाजिक नेते यांची मदत घ्यावी
Posted On:
11 MAY 2021 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2021
देशातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांबरोबर 33 वी बैठक घेतली. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांनी उपस्थिती लावली.
लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असणाऱ्यांना प्राधान्य दिले जावे यावर तसेच लसीची नासाडी कमीत कमी कशी होईल या दिशेने प्रयत्न करण्याच्या गरजेवर कॅबिनेट सचिवांनी भर दिला. लसीकरणाविषयी चुकीची माहिती पसरण्याबद्दल चिंता व्यक्त करत, केंद्र सरकार अथवा राज्य सरकारांनी खरेदी केलेल्या सर्व लसी वास्तविक पाहता राज्यांतील लोकांसाठीच असून, केंद्रीय पातळीवर त्यांचा कोणत्याही प्रकारे वापर होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना चाचण्या, अतिदक्ष कार्यवाही आणि या महामारीला स्थानिक स्तरावर पोहोचून प्रतिबंध घालणे, तसेच रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा बळकट करणे, मनुष्यबळ वाढविणे, प्राणवायू इत्यादी सामग्रीचे न्यायोचित व तर्कसंगत उपयोजन करणे अशा विविध बाबींचा प्राधान्यक्रमानुसार विचार केला पाहिजे असे आरोग्य सचिवांनी सांगितले. पीएसए पद्धतीचे 1213 प्राणवायू प्रकल्प येत्या तीन महिन्यात उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. लसीचा न्याय्य वापर करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार करत त्यांनी लसीच्या दोन्ही मात्र घेण्याविषयी जनजागृती मोहीम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. अधिक चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी दोन्ही मात्रा घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
लसीच्या निर्मात्यांशी दररोज संवाद साधण्यासाठी राज्यांनी विशेष समर्पित पथकांची स्थापना करावी.
कोविड समुचित वर्तणूक कायम ठेवण्याविषयी तसेच सरकारच्या विविध मार्गदर्शक सूचनांविषयी जनजागृती करण्यावर माहिती आणि प्रसारण सचिवांनी भर दिला. या सर्व सूचना https://www.mygov.in/covid-19/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
निमशहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात क्षेत्रस्तरीय कर्मचारी जसे आशा सेविका, अंगणवाडी सेविका, एएनएम दाई आणि इतर यांना सहभागी करून घेत आणखी जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समुदाय पातळीवर काम करणारे सामाजिक नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रभावशाली व्यक्ती यांनाही सामील करून घेत लोकांना उचित पद्धतीने मार्गदर्शक सूचना समजावण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. जेणेकरून कोविडच्या प्रारंभिक लक्षणे व कोरोनामध्ये घेण्याच्या काळजीविषयी लोकांमध्ये भीतीची भावना राहणार नाही.
M.Chopade/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717822)
Visitor Counter : 171