विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
किफायतशीर आणि स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वाढीला लागलेली उद्योजकतेची भावना, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त अधोरेखित
Posted On:
11 MAY 2021 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2021
किफायतशीर आणि स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वाढीला लागलेली उद्योजकतेची भावना, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त अधोरेखित झाली.
11 मे 1998 रोजी पोखरण येथे अणुबॉम्बच्या यशस्वी चाचण्या केल्यामुळे हा दिवस भारताच्या तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरतो. अशा अभिनव संकल्पनांची निर्मिती आणि पाठपुरावा करणाऱ्या संशोधकांच्या सन्मानार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. अशा नवोन्मेषी विचारवंतांचा आणि उद्योजकांचा दरवर्षी या दिवशी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
वर्ष 2021 साठी, तंत्रज्ञान विकास मंडळाने राष्ट्रीय पुरस्कारांसाठी तीन श्रेणींमधून अर्ज मागविले होते आणि कठोर अशा द्विस्तरीय मूल्यमापनाद्वारे एकूण 15 विजेत्यांची निवड करण्यात आली. यासाठी निष्णात शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी परीक्षक म्हणून काम केले.
वर्ष 2020-21 करिता तीन श्रेणींतील राष्ट्रीय पुरस्कार पुढीलप्रमाणे-
श्रेणी- 1:
स्वदेशी तंत्रज्ञानाच्या यशस्वी व्यावसायिकरणाबद्दल दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार -
यावर्षी पुढील दोन कंपन्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली-
मेसर्स बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेड, मुंबई.
बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेडने विविध प्रकारच्या सौरकाचांची निर्मिती करणारे अद्ययावत तंत्र विकसित केले. 2 मिमी जाडीच्या या काचा पूर्णपणे टेंपर्ड काचा असून उच्च-शक्तीच्या काच-काच व्दिपृष्ठीय प्रकारांसाठी त्यांचा वापर होतो.
मेसर्स रैना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई.
या कंपनीने टीआरसी म्हणजेच टेक्सटाईल रिइन्फोर्सड काँक्रीट तयार केले असून, बांधकाम क्षेत्रासाठी त्याच्या साच्यांच्या उत्पादन आणि विक्रीचे काम ही कंपनी करते.
श्रेणी-2 -:
एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि माध्यम उद्योगांच्या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार
मेसर्स प्लस ऍडवान्सड टेक्नॉलॉजिज लि., गुरुग्राम. -
औषधनिर्मिती क्षेत्रात वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल अशी स्वदेशी बनावटीची 'सेलशुअर' नामक तापमान-नियंत्रित पेटी या कंपनीने तयार केली आहे. ठराविक नियंत्रित तापमान कायम राखणारे फेज चेंज मटेरियल तंत्रज्ञान हा त्या प्रणालीचा गाभा होय.
मेसर्स इंटॉट टेक्नॉलॉजिज प्रा. लि. , कोची-
बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेली डिजिटल रेडिओ प्रक्षेपण तंत्रे, डिमॉड्युलेशनसारख्या विविध गुंतागुंतीच्या प्रक्रियांसाठी चिपचा वापर करतात.
मेसर्स ओलीन लाईफ सायन्सेस प्रा.लि., चेन्नई-
या कंपनीने आल्याच्या अर्काची जिनफोर्ट ही भुकटी तयार केली असून त्यावर ट्रेडमार्कही मिळवला आहे. या भुकटीत अधिक प्रमाणात जिंजेरॉईड (>26% एकूण जिंजेरॉल्सच्या तुलनेत) असते. पेटन्ट असलेले अक्वेसोम तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे.
श्रेणी- 3
तंत्रज्ञान स्टार्ट अप श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार
मेसर्स प्रॉफिशिअंट व्हिजन्स सोल्युशन्स प्रा.लि., खरगपूर
या कंपनीने क्लिअर व्हिजन नावाचे उत्पादन तयार केले आहे. चित्रफितींमधील पाऊस आणि धुके इत्यादी हवामान घटकांना त्याच वेळी (रियल टाइम) काढून टाकण्यासाठी हे काम करते.
मेसर्स आयरॉव्ह टेक्नॉलॉजीज प्रा.लि., केरळ.
ही कंपनी आयरॉव्ह-टुना हे दुरून चालविता येणारे वाहन वापरून पाण्याखालील तपास आणि निरीक्षण यासाठी सेवा पुरविते. आयरॉव्ह-टुना हे जलमग्न पदार्थांच्या सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे सूक्ष्म आरओव्ही आहे.
मेसर्स फॅबहेड्स ऑटोमेशन प्रा.लि., चेन्नई.
उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेत स्वयंचलितता आणून स्वदेशी बनावटीच्या कार्बन फायबर लेअप तंत्रज्ञानाने उत्पदनातील अडचणी सोडविल्या जातात.
मेसर्स प्लाबेल्टेक ऑटोमेशन प्रा.लि., भोपाळ.
या कंपनीने ग्लाय टॅग मंचाची निर्मिती केली आहे. या शिसेयुक्त प्रतिपिंड-औषध-दुव्यांमुळे दृग्गोचर होणाऱ्या अँटी प्रोलिफ्रेटिव्ह क्रियाशीलतेमुळे स्तनांच्या कर्करोगाच्या उपचारात मदत होते.
मेसर्स ब्रीद अप्लाइड सायन्सेस प्रा.लि., बेंगळुरू.
कार्बनडाय ऑक्साईडचे मिथेनॉलमध्ये रूपांतर करण्याची प्रयोगशाळेतील प्रक्रिया ब्रीदने यशस्वीरीत्या प्रायोगिक (पायलट) तत्त्वापर्यंत आणली आहे.
मेसर्स सायरन एआय सोल्युशन्स,दिल्ली.
या कंपनीने एकमेवाद्वितीय असे 'बुद्धी एआय डीआयवाय किट' शोधून काढले असून त्याचे पेटंटही घेतले आहे. बुद्धी हा इंग्रजी अद्याक्षरांवरून बनवलेला शब्द असून बुद्धी म्हणजे- मानवसदृश बुद्धिमत्तेची उभारणी, आकलन, रचना आणि उपयोग- होय.
मेसर्स थेरानौटिलस प्रा.लि . - बेंगळुरू.
दातांमधील दंडगोलाकारनलिकांमध्ये शिरून काम करणाऱ्या नॅनो रोबोना मार्गदर्शन करण्यासाठीचे उपकरण या कंपनीने तयार केले आहे.
मेसर्स सिनथेरा बायोमेडिकल प्रा.लि . - पुणे.
या कंपनीने जैविक दृष्ट्या सक्रिय असणारे पोरोसिन हे अस्थिकलम तयार केले आहे. अपघात, आजार वगैरे कारणांनी उद्भवलेल्या अस्थिभंगावरील शस्त्रक्रियांमध्ये अस्थींच्या पुनर्निर्माण व दुरुस्तीसाठी हे उपयुक्त ठरते.
मेसर्स मल्टी नॅनो सेन्स टेक्नॉलॉजीज प्रा.लि.- नागपूर
या कंपनीने स्वदेशी बनावटीचे हायड्रोजन सेन्सर्स बनविले आहेत. हे स्थायू अवस्थेतील विद्युतरासायनिक सेन्सर्स असून हायड्रोजन हुडकून काढण्याच्या अनेक अवघड ठिकाणी त्याचा उपयोग होतो.
मेसर्स नोकार्क रोबोटिक्स प्रा.लि.- पुणे. –
या कंपनीने पूर्णपणे देशी बनावटीचा V310 ICU व्हेंटिलेटर (जीवरक्षक प्रणाली) बनविला असून त्यासाठी कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील केंद्राचे सहकार्य त्यांनी घेतले आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी त्यांनी याचे पूर्ण व्यापारीकरण केले आहे. क्लिनिकल दृष्टीने हे व्हेंटिलेटर वैध ठरले असून IEC 60601-1 दर्जानुसार ते प्रमाणित आहेत.
परिशिष्ट
एमएसएमई श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार
मेसर्स प्लस ऍडवान्सड टेक्नॉलॉजिज लि, मेसर्स इंटॉट टेक्नॉलॉजिज प्रा. लि, मेसर्स ओलीन लाईफ सायन्सेस प्रा.लि.
तंत्रज्ञान स्टार्ट अप श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार
S.Tupe/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717718)
Visitor Counter : 234